Skin Care Tips : मुरुमांपासून पिगमेंटेशनपर्यंत, त्वचेची काळजी घेताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञ सांगतात... 'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Skin Care Tips : मुरुमांपासून पिगमेंटेशनपर्यंत, त्वचेची काळजी घेताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञ सांगतात...

तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते किंवा नैसर्गिक पदार्थ नेहमी सुरक्षित असतात, असे तुम्हालाही वाटते? त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या ५ सामान्य गैरसमजांमागचे सत्य.

किशोरी घायवट-उबाळे

चेहऱ्यावर मुरुम येणे, डाग पडणे किंवा त्वचेचा रंग असमान होणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. या समस्यांवर उपाय करताना अनेक जण घरगुती प्रयोग करतात किंवा सोशल मीडियावरील सल्ल्यांवर विश्वास ठेवतात. मात्र, त्वचेबाबतच्या काही चुकीच्या समजुतींमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. गरम पाण्याने चेहरा धुतल्याने रोमछिद्रे उघडतात, तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते किंवा नैसर्गिक पदार्थ त्वचेसाठी नेहमीच सुरक्षित असतात, असे अनेक गैरसमज आहेत. त्वचारोगतज्ज्ञांनी अशाच ५ सामान्य गैरसमजांमागचे सत्य स्पष्ट केले आहे.

त्वचेबाबत गैरसमज का पसरतात?

त्वचेवरील बदल सहज दिसून येतात. त्यामुळे मुरुम, पिगमेंटेशन किंवा डाग यांसारख्या समस्यांचा व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. अशा वेळी अनेक जण लगेच परिणाम देणारे उपाय किंवा महागडी उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करतात.

एस्थेटिक फिजिशियन आणि स्किनिकच्या संस्थापक डॉ. शल्लू कापील यांच्या मते, सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातींमधून त्वचेच्या समस्यांबाबत भीती निर्माण केली जाते. त्यामुळे काही दिवसांत डाग किंवा मुरुम दूर होतील, अशा दाव्यांवर लोक सहज विश्वास ठेवतात. घरगुती उपायही अनेकदा वापरले जातात; मात्र प्रत्येक उपाय प्रत्येक त्वचेला सूट होईलच असे नाही.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सोमा सरकार यांच्या मते, सोशल मीडियावरील सल्ले किंवा चुकीच्या उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकतात. योग्य उपचार मिळण्यासही उशीर होऊ शकतो. त्यामुळे त्वचेच्या गरजेनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच स्किनकेअर उत्पादने निवडणे महत्त्वाचे आहे.

त्वचेबाबतचे ५ सामान्य गैरसमज आणि त्यामागचे सत्य

१. गरम पाण्याने रोमछिद्रे उघडतात आणि थंड पाण्याने बंद होतात

  • गैरसमज : चेहरा गरम पाण्याने धुतल्याने त्वचेवरील रोमछिद्रे उघडतात आणि थंड पाण्याने धुतल्यावर ती बंद होतात, असे अनेकांना वाटते.

  • सत्य : प्रत्यक्षात रोमछिद्रे दरवाज्याप्रमाणे उघडत किंवा बंद होत नाहीत. गरम पाण्यामुळे त्वचेवरील तेल मऊ होऊ शकते. मात्र, खूप गरम पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेचा नैसर्गिक संरक्षणात्मक थर खराब होऊ शकतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे आणि जळजळ होण्याची शक्यता असते. अतिथंड पाण्यामुळे त्वचा काही वेळ घट्ट वाटू शकते पण वारंवार बर्फासारखे थंड पाणी वापरल्याने त्वचा कोरडी आणि खडबडीत होऊ शकते. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

२. तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते

  • गैरसमज : त्वचा आधीच तेलकट असल्याने मॉइश्चरायझर लावण्याची गरज नसते, असा अनेकांचा समज असतो.

  • सत्य : त्वचेवरील तेल आणि त्वचेतील ओलावा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तेलकट त्वचेमध्ये सीबम म्हणजेच नैसर्गिक तेल जास्त तयार होते. मात्र त्यामुळे त्वचेला ओलाव्याची गरज नसते असे नाही. मॉइश्चरायझर वापरणे टाळल्यास किंवा तेल कमी करण्यासाठी अतिशय कडक उत्पादने वापरल्यास त्वचेचा संरक्षणात्मक थर खराब होऊ शकतो. त्यामुळे तेलकट त्वचेसाठी हलके, जेल किंवा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर निवडावे.

३. नैसर्गिक पदार्थ त्वचेसाठी नेहमीच सुरक्षित असतात

  • गैरसमज : घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही, असे अनेकांना वाटते.

  • सत्य : नैसर्गिक म्हणजे प्रत्येकासाठी सुरक्षित असे नाही. उदाहरणार्थ, कोरफडीच्या पानातून थेट जेल काढून लावल्यास काही जणांना त्वचेची जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते. त्याचप्रमाणे काही एसेंशियल ऑइल, लिंबाचा रस आणि वनस्पतींपासून तयार केलेले अर्क त्वचेला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्यातील घटक, प्रमाण आणि आपल्या त्वचेला ते सूट होते का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

४. उन्हाळ्यातच सनस्क्रीन लावणे आवश्यक असते

  • गैरसमज : फक्त ऊन असतानाच सनस्क्रीन लावावे. ढगाळ वातावरणात किंवा घरात असताना सनस्क्रीनची गरज नसते, असा समज आहे.

  • सत्य : सूर्याच्या UVA किरणांचा प्रभाव ढगाळ वातावरणातही राहू शकतो. हे किरण खिडकीच्या काचेतूनही आत येऊ शकतात. त्यामुळे त्वचेचे अकाली वृद्धत्व आणि कोलेजनचे नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच सकाळच्या स्किनकेअर रुटीनमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा समावेश करावा. तसेच उत्पादनावरील सूचनांनुसार त्याचा पुन्हा वापर करावा.

५. कोणाच्याही सल्ल्याने कोणतेही उत्पादन वापरले तरी चालते

  • गैरसमज : पिगमेंटेशन, मुरुम किंवा टॅनिंगची समस्या असल्यास घरगुती उपाय किंवा बाजारातील कोणतेही उत्पादन वापरल्याने फायदा होतो.

  • सत्य : पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्वचेवर ब्लीचिंग उत्पादने लावणे किंवा लिंबाचे तुकडे चोळणे यामुळे त्वचेला जळजळ आणि नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे मुरुमांवर टूथपेस्ट किंवा लाळ लावल्याने ते एका रात्रीत बरे होतात, हा देखील चुकीचा समज आहे. अशा प्रयोगांऐवजी त्वचेच्या समस्येनुसार तयार केलेली उत्पादने वापरावीत. योग्य उपचारांसाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

त्वचेची काळजी घेताना तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी सोशल मीडियावरील ट्रेंड किंवा झटपट परिणाम देणाऱ्या उपायांवर अवलंबून राहू नका. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याला उपयोगी पडलेला उपाय आपल्यालाही फायदेशीर ठरेलच असे नाही. त्वचेची गरज ओळखून योग्य उत्पादने निवडा आणि कोणताही उपचार सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

FDA ची राज्यव्यापी कारवाई; १.९० कोटींचा साठा जप्त; मुंबईतील ६ पानटपऱ्यांवर कारवाई

Mumbai : सीएसएमटी रेल्वे स्थानकाला बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांकडून धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

Mumbai : छठपूजेनिमित्त बेस्टची विशेष बससेवा; जुहू बीचवर जाण्यासाठी २२ अतिरिक्त बस, जाणून घ्या मार्ग अन् वेळ

सोनाक्षी सिन्हाच्या मॉर्फ फोटोंप्रकरणी दिल्लीतील तरुणाला अटक; पण कोर्टाकडून आरोपीची सुटका, नेमकं कारण काय?

IndiGo Emergency Landing : गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; पुण्यात आपत्कालीन लँडिंग, १९२ जण सुखरूप