चविष्ट आणि हेल्दी सोया चणा डाळ भुर्जी; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

चविष्ट आणि हेल्दी सोया चणा डाळ भुर्जी; मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल

सोयाचे दाणेदार तुकडे आणि चणा डाळ यामुळे ही रेसिपी केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. ही भुर्जी तुम्ही रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता.

किशोरी घायवट-उबाळे

दररोज नाश्त्यात किंवा जेवणात काय बनवायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी चविष्ट, पौष्टिक आणि पटकन तयार होणारी रेसिपी मिळाली तर मजाच काही वेगळी असते. जर तुम्ही हेल्दी आणि प्रोटीनयुक्त पदार्थ शोधत असाल, तर सोया चणा डाळ भुर्जी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सोयाचे तुकडे आणि चणा डाळ यामुळे ही रेसिपी केवळ टेस्टीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. ही भुर्जी तुम्ही रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करू शकता.

साहित्य :

  • १ कप सोयाचे तुकडे (भिजवून पाणी काढलेले)

  • अर्धा कप चणा डाळ (भिजवलेली)

  • १/४ टीस्पून हिंग

  • २ टेबलस्पून तेल

  • १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट

  • १ टीस्पून लाल तिखट

  • २ टीस्पून धणेपूड

  • अर्धा टीस्पून हळद

  • १ टीस्पून जिरेपूड

  • चवीनुसार मीठ

  • १ मोठा कांदा (बारीक चिरलेला)

  • १ टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • १ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

  • १ सुक्या लाल मिरची

  • २ टेबलस्पून कोथिंबीर

  • १ टीस्पून लिंबाचा रस

कृती :

सर्वप्रथम चणा डाळ किमान अर्धा तास भिजवून ठेवा. वेळ कमी असल्यास डाळ आधी २ ते ३ शिट्ट्या देऊन शिजवूनही घेऊ शकता.

यानंतर कढईत तेल गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरची आणि कांदा घालून परता. कांदा हलका गुलाबी झाल्यावर त्यात हिंग आणि हिरवी मिरची घाला.

आता सोयाचे दाणेदार तुकडे घालून काही मिनिटं चांगलं परता, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.

आता भिजवलेली चणा डाळ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. त्यामध्ये लाल तिखट, धणेपूड, जिरेपूड, हळद आणि मीठ घालून सतत हलवत परता. गरज असल्यास थोडंसं पाणी घालू शकता.

काही मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर वरून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला. गरमागरम सोया चणा डाळ भुर्जी रोटी किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.

टिप्स :

  • अधिक चविष्ट बनवण्यासाठी वरून थोडं बटर घालू शकता.

  • वजन कमी करण्यासाठी कमी तेलाचा वापर करा.

  • भुर्जीमध्ये मटार किंवा शिमला मिरची घालून ती अधिक पौष्टिक बनवू शकता.

  • सोयाचे तुकडे चांगले पिळून घेतल्यास भुर्जी अधिक चविष्ट लागते.

Mumbai : ॲॅक्वा मेट्रोतून ७.२ कोटी जणांचा प्रवास; वर्षभरात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

दूध उत्पादन २५ ते ३० टक्क्यांनी घटले; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

एअर इंडिया, अकासाचा प्रवास महागणार

महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्ण माघार; दुष्काळाचे संकट गडद, कोकण-गोव्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा