'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

भजी-कटलेटला द्या सुट्टी; ट्राय करा रताळ्याचे प्रोटीनयुक्त ठेचा कबाब, वेट लॉससाठी हेल्दी स्नॅक

संध्याकाळच्या भुकेसाठी हेल्दी आणि चविष्ट पर्याय शोधत आहात? रताळे, मूगडाळ, मटार आणि पनीरपासून तयार होणारे झणझणीत ठेचा कबाब अवघ्या १५ मिनिटांत बनवा. वजन नियंत्रणात ठेवणारा, प्रथिने आणि फायबरयुक्त हा पौष्टिक स्नॅक नक्की ट्राय करा.

Mayuri Gawade

संध्याकाळची भूक लागली की काहीतरी चटपटीत, खमंग आणि पोटभर खावंसं वाटतं. मात्र वजन नियंत्रणात ठेवायचं असेल, तर भजी, कटलेट किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळावं लागतं. अशा वेळी चव आणि आरोग्य यांचा उत्तम मेळ साधणारा एक पर्याय म्हणजे रताळ्याचे ठेचा कबाब. फायबर, प्रथिने आणि पौष्टिक घटकांनी भरलेले हे कबाब वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही उत्तम स्नॅक ठरू शकतात.

रताळ्यामध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात, तर मूगडाळ, मटार आणि पनीर यामुळे या पदार्थातील प्रथिनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हा स्नॅक चवदार तर लागतोच, शिवाय बराच वेळ पोट भरल्याची जाणीवही करून देतो.

साहित्य

ठेच्यासाठी

  • १ मोठा चमचा तेल

  • १/२ कप शेंगदाणे

  • ४ ते ५ हिरव्या मिरच्या

  • १ छोटा तुकडा आले

  • ८ ते १० लसूण पाकळ्या

  • १ मूठभर कोथिंबीर

कबाबसाठी

  • १/२ कप भिजवलेली मूगडाळ

  • १ कप उकडलेले हिरवे मटार

  • १ कप उकडलेले आणि मॅश केलेले रताळे

  • ५० ग्रॅम किसलेले पनीर

  • १ बारीक चिरलेला कांदा

  • १/२ चमचा चाट मसाला

  • १/२ चमचा जिरेपूड

  • १/२ चमचा धणेपूड

  • १/२ चमचा लाल तिखट

  • १ चमचा लिंबाचा रस

  • चवीनुसार मीठ

  • २ मोठे चमचे तेल

कृती

ठेचा तयार करा

कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, आले, लसूण आणि कोथिंबीर हलके परतून घ्या. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

कबाबचे मिश्रण बनवा

मिक्सरमध्ये भिजवलेली मूगडाळ, उकडलेले मटार आणि तयार ठेचा घालून जाडसर पेस्ट तयार करा. एका मोठ्या भांड्यात मॅश केलेले रताळे घ्या. त्यात ही पेस्ट, पनीर, कांदा, चाट मसाला, जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून सर्व साहित्य एकजीव करा.

कबाब शॅलो फ्राय करा

तयार मिश्रणाचे लहान कबाब किंवा टिक्कीच्या आकाराचे गोळे बनवा. तव्यावर थोडे तेल घालून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करा.

का आहे हा स्नॅक खास?

  • फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते

  • मूगडाळ, मटार आणि पनीरमुळे प्रथिने मिळतात

  • डीप फ्राय नसल्याने तुलनेने हलका पर्याय

  • वजन नियंत्रणासाठी आहारात समाविष्ट करता येणारा पौष्टिक स्नॅक

  • मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी चव

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

पालघर रुग्णालय हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे

अंधेरी, गोरेगावातील अतिक्रमण हटवले; अकराशे मीटर लांब फुटपाथवरील बेकायदा बांधकामांवर हातोडा; स्टॉल, बेकायदा बांधकामे, वाढीव शेड केले जमीनदोस्त

आकड्यांच्या पलीकडे तथ्याचे आकलन