आजकाल ऑनलाइन पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. Google Pay, PhonePe, Paytm यांसारख्या अॅप्समुळे पैसे पाठवणं सोपं झालं आहे. मात्र, अनेकदा खात्यातून पैसे कट होतात, पण समोरच्या व्यक्तीला किंवा व्यापाऱ्याला ते मिळत नाहीत. अशा वेळी ग्राहकांना पैशांच्या परताव्याची चिंता सतावते. पण तुम्हाला माहीत आहे का, ठरलेल्या वेळेत पैसे परत न मिळाल्यास काही प्रकरणांमध्ये बँकेला दररोज १०० रुपये भरपाई द्यावी लागू शकते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, ही भरपाई कधी मिळू शकते आणि अशा वेळी काय करावं, जाणून घ्या.
पैसे परत मिळण्यासाठी किती दिवस लागतात?
UPI व्यवहार अयशस्वी झाल्यानंतर पैसे परत करण्यासाठी RBI ने व्यवहाराच्या प्रकारानुसार वेगवेगळी मुदत ठरवली आहे. एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवताना तुमच्या खात्यातून रक्कम कट झाली, पण समोरच्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाली नाही, तर ती रक्कम T+1 दिवसात परत केली पाहिजे. म्हणजेच व्यवहार झालेल्या दिवसानंतरच्या पुढील दिवसापर्यंत पैसे परत मिळणे अपेक्षित आहे.
दुकानात किंवा व्यापाऱ्याकडे UPI द्वारे पेमेंट करताना खात्यातून पैसे कट झाले, पण व्यापाऱ्याला पेमेंटची पुष्टी मिळाली नाही, तर अशा व्यवहारासाठी T+5 दिवसांची मुदत आहे. म्हणजेच व्यवहाराच्या दिवसापासून पाच दिवसांच्या आत रक्कम परत होणे अपेक्षित आहे. येथे T म्हणजे व्यवहार झालेला दिवस.
पैसे परत मिळण्यास उशीर झाल्यास रोज १०० रुपये
RBI ने ठरवलेल्या मुदतीत पैसे परत न मिळाल्यास, विलंब झालेल्या प्रत्येक दिवसासाठी ग्राहकाला १०० रुपये भरपाई मिळू शकते. मात्र, ही भरपाई व्यवहाराच्या प्रकारानुसार ठरवलेल्या मुदतीनंतर झालेल्या विलंबासाठी लागू होते. त्यामुळे प्रत्येक फेल झालेल्या व्यवहारासाठी लगेचच १०० रुपये मिळतील, असं नाही.
नियमांनुसार, पात्र ठरणाऱ्या प्रकरणांमध्ये बँकेने ही भरपाई ग्राहकाच्या खात्यात आपोआप जमा करणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतंत्रपणे भरपाईचा दावा करण्याची गरज नसते.
UPI पेमेंट फेल झाल्यास काय कराल?
तुमच्या खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट पूर्ण झालं नसेल, तर घाईघाईने पुन्हा पैसे पाठवू नका. आधी व्यवहाराची स्थिती तपासा. त्यानंतर पुढील गोष्टी करा.
ट्रान्झॅक्शन स्टेटस तपासा : Google Pay, PhonePe, Paytm किंवा तुम्ही वापरत असलेल्या UPI अॅपमधील व्यवहारांची हिस्ट्री पाहा.
पुरावे जतन करा : व्यवहाराचा आयडी, तारीख, वेळ आणि पेमेंटचे स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा.
अॅपवर तक्रार नोंदवा : संबंधित अॅपमधील Help किंवा Support विभागातून तक्रार दाखल करा.
बँकेशी संपर्क साधा : समस्या सुटत नसेल, तर तुमच्या बँकेकडे तक्रार करा.
तक्रार क्रमांक जपून ठेवा : पुढील पाठपुराव्यासाठी तक्रारीचा संदर्भ क्रमांक उपयोगी पडतो.
बँकेकडून मदत न मिळाल्यास RBI कडे तक्रार करा
बँकेकडे तक्रार करूनही समस्या सुटत नसेल, तर प्रथम बँकेच्या तक्रार निवारण विभागाकडे पाठपुरावा करा. तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांत बँकेकडून उत्तर मिळालं नाही किंवा मिळालेल्या उत्तराचं ग्राहकाला समाधान नसेल, तर पात्रतेच्या अटींनुसार RBI च्या लोकपाल यंत्रणेकडे तक्रार करता येते.
यासाठी RBI च्या तक्रार व्यवस्थापन प्रणालीला cms.rbi.org.in या वेबसाइटवर भेट देता येते. तक्रार करताना व्यवहाराशी संबंधित सर्व नोंदी, स्क्रीनशॉट आणि बँकेकडे केलेल्या तक्रारीचे तपशील सोबत ठेवा.