Freepik
लाईफस्टाईल

Oral Cancer: तोंडाच्या कॅन्सरची काय असतात लक्षणे? जाणून घ्या

Tejashree Gaikwad

World No Tobacco Day: तोंडाचा (मुख आणि जीभ) कॅन्सर हा एक जीवघेणा आजार असून या आजाराच्या संपूर्ण जगभरातील रुग्णांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त रुग्ण आपल्या देशात आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, आपल्या देशात तंबाखू व तंबाखूशी संबंधित उत्पादनांचा सर्रास केला जाणारा वापर हे यामागचे प्रमुख कारण आहे. धुम्रपानामध्ये तंबाखू असतो, तसेच तो विविध प्रकारे खाल्ला देखील जातो आणि या दोन्ही गोष्टी तोंडाचा कॅन्सर होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. पण तंबाखू चावून, चघळून खाणे हे तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात मोठे कारण आहे, आणि नेमके हेच आपल्याकडे सर्वात जास्त प्रमाणात केले जाते. याखेरीज सुपारी हे एक कार्सिनोजेनिक कंपाउंड असून तोंडाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत असते. नवी मुंबई येथील अपोलो कॅन्सर सेंटरचे ऑन्कोलॉजी-सिनियर कन्सल्टन्ट डायरेक्टर डॉ अनिल डिक्रूज यांच्याकडून अधिक जाणून घ्या.

सिगरेट, सिगार आणि बिडी या तंबाखू सेवनाच्या इतर प्रकारांमुळे देखील तोंडाचा कॅन्सर होतो. भरपूर प्रमाणात आणि दीर्घकाळपर्यंत तंबाखूचा वापर करत राहिल्यास धोका खूप जास्त वाढतो. तंबाखूसोबत अल्कोहोल हे तर प्रचंड धोकादायक आहे, कारण अल्कोहोलमुळे तंबाखूचा कार्सिनोजेनिक प्रभाव वाढतो. तंबाखू आणि सुपारीचे सेवन करणे पूर्णपणे थांबवणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तंबाखूचे सेवन जितके जास्त आणि जितके दीर्घकाळ केले जात असेल तितका त्याचा धोका जास्त ही बाब जरी खरी असली तरी अगदी थोड्या प्रमाणात जरी सेवन किंवा वापर केला असला तरी त्याने कॅन्सर होऊ शकतो. उर्वरित जगाच्या तुलनेत भारतामध्ये तोंडाचा कॅन्सर एक दशक आधी आला. नुसती सुपारी खाल्याने म्युकस फायब्रोसिस होतो, यामध्ये तोंड पांढरे पडते, तोंड नीट उघडता येत नाही, कोणतेही मसाल्याचे पदार्थ खाता येत नाहीत. सबम्युकस फायब्रोसिस असलेल्या लोकांनी जर तंबाखूची सवय कायम ठेवली तरी कॅन्सर होण्याचा धोका खूप जास्त वाढतो.

यंदाच्या वर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा विषय युवा पिढीला उद्योगक्षेत्राच्या प्रभावापासून वाचवणे हा आहे. आपल्या देशासाठी हा विषय विशेष संयुक्तिक आहे कारण आपल्याकडे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये चावून, चघळून खाण्याच्या उत्पादनांची जाहिरात केली जाते, त्यामध्ये वेलची आणि त्यासारखी इतर उत्पादने दाखवली जातात, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या घातक उत्पादनांची नक्कल केलेली असते. आपल्या देशात मुलांना किशोरवयात येण्याच्या आधीच याची सवय लागलेली असते त्यामुळे जीवनातील सर्वोत्तम काळातच ते कॅन्सरला बळी पडतात. खरेतर या मुलांनी आपल्या देशाच्या आर्थिक वृद्धीमध्ये योगदान देणे अपेक्षित आहे.

तोंडाच्या कॅन्सरचे धोके आणि प्रतिबंध

तोंडाच्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. तंबाखूचा वापर करणे पूर्णपणे बंद करणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे. कौन्सेलिंग आणि निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीसारख्या तंबाखू सोडवण्यासाठीच्या संसाधनांचा उपयोग करून घेतल्यास धूम्रपान किंवा तंबाखू चावणे, चघळणे सोडण्यात खूप मदत होऊ शकते. तोंडाची नीट स्वच्छता राखणे, रोजच्या आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आणि अल्कोहोलचे भरपूर सेवन करणे टाळणे या काही महत्त्वाच्या उपाययोजना करून तंबाखू सेवन, वापर कायमचे सोडून देणे शक्य आहे.

तोंडाच्या कॅन्सरची पुढीलपैकी कोणतीही लक्षणे दिसत असल्यास सावधान राहा:

१. तोंडाचा रंग बदलणे. तोंडाच्या आतील भागाचा रंग गुलाबीसर, निरोगी दिसायला हवा. सफेद किंवा लाल चट्टे दिसत असतील, ४ ते ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ तसेच राहिलेले असतील आणि तुम्ही जर तंबाखू खात, चघळत असाल तर तातडीने डॉक्टरांना दाखवा.

२. तोंड किंवा जिभेच्या भागात अल्सर झालेला असेल आणि तो २ ते ४ आठवडे तसाच राहिलेला असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवा.

३. कोणताही दात सैल होणे किंवा जबड्याचा रंग बदलणे किंवा तोंडावर गालाच्या ठिकाणी सूज येणे अशा लक्षणांची तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

४. कॅन्सर मानेच्या लसीका ग्रंथींपर्यंत पसरू शकतो. काहीवेळा आधी फक्त मानेमध्ये सूज दिसते आणि त्याचे कारण माहिती नसते पण अल्सर डायग्नोसिस करता येते.

५. ओरल सबम्युकस फायब्रोसिस (तोंडाचा रंग पांढरा पडणे, तोंड उघडायला त्रास होणे आणि मसाल्याचे कोणतेही पदार्थ खाताना खूप त्रास होणे)

६. कवळी नीट बसत नसेल किंवा दात टोकदार असेल तरी कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे असे त्रास होत असतील तर तातडीने डॉक्टरना दाखवा.

७. तोंडाची अस्वच्छता असणे. दातांची नियमितपणे तपासणी करून घेणे आणि तोंड वारंवार स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

तंबाखू खाणे बंद करून आणि आरोग्यदायी सवयी स्वीकारून तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी केला जाऊ शकतो आणि व्यक्ती निरोगी, कॅन्सर-मुक्त जीवन जगू शकते. दातांची नियमितपणे तपासणी करून घेण्यास आणि स्वतः स्वतःच्या तब्येतीवर नीट लक्ष ठेवण्यास प्राधान्य दिल्यास, जेव्हा गरज भासेल तेव्हा तातडीने प्रोफेशनल्सची मदत घेतल्यास, आजार लवकरात लवकर लक्षात येतो आणि उपचारांची परिणामकारकता वाढते.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त