डिजिटल युगात सातत्याने होणाऱ्या जाहिरातींच्या प्रभावाखाली तुम्ही येत नसाल तर ही एक चांगली गोष्ट आहे. सामान्यपणे १० वर्षांपूर्वी पर्यंत प्रत्येक पार्टीत, समारंभात नवीनच कपडे, ज्वेलरी घालणे हा मोठा ट्रेंड होता. इथे नवीन याचा अर्थ यापूर्वी एकदाही न वापरलेले कपडे एखाद्या पार्टी, सण, समारंभात वापरायचे त्यानंतर ते लगेच जुने होऊन जातात. पुन्हा त्याला रिपीट न करणे हा ट्रेंड होता. मात्र, गेल्या ५ ते ६ वर्षात हा ट्रेंड बदलला आणि पुन्हा-पुन्हा तेच ते कपडे ज्वेलरी वापरणे हे हळूहळू ट्रेंडमध्ये येऊ लागले. ५-६ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा ट्रेंड आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कारण हा ट्रेंड पर्यावरण पूरक आहे. अनेक सेलिब्रिटी हा ट्रेंड फॉलो करत आहे.
स्लो फॅशन ट्रेंड म्हणजे नेमकं काय?
वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये कपडे किंवा ज्वेलरी रिपीट करणे अगदी तुम्ही तुमच्या आई, आजीची एखादी खूप सांभाळून ठेवलेली साडी पुन्हा घालणे या गोष्टींना स्लो फॅशन ट्रेंड म्हणतात. ज्यामध्ये तुमच्यातील एखादी गोष्ट मोठ्या काळापर्यंत सांभाळून ठेवण्याची कला जोपासता. तसेच यामुळे पर्यावरणालाही फायदा होतो.
अशा शैली कधीच जुन्या होत नाही
एव्हरग्रीन फॅशनमध्ये म्हणजेच स्लो फॅशनमध्ये कपड्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले जाते. ते बनवताना, असे नैसर्गिक तंतू, कापड, जरी, भरतकाम, लेस, रंग किंवा धागे वापरले जातात जे जास्त काळ खराब होत नाहीत. अर्थात, जेव्हा कपड्यांचा दर्जा चांगला असेल तेव्हा तुम्ही ते जास्त काळ वापरू शकाल. ही पर्यावरणपूरक फॅशन आहे. यामध्ये उच्च दर्जाचे कापड वापरले जाते आणि ड्रेस तयार होण्यासही बराच वेळ लागतो, असे फॅशन डिझाईनर्सचे मत आहे.
सेलिब्रिटी करत आहेत हा ट्रेंड फॉलो
सामान्यपणे ५ ते ६ वर्षांपूर्वी सुरू झालेला ट्रेंड हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज सेलिब्रिटी जगत स्लो फॅशनची संकल्पना मोठ्या प्रमाणात ट्रेंडिग होत आहे. त्यामुळे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हॉलिवूड ते बॉलिवूड अनेक स्टार्स याची उदाहरणे आहेत.
काही काळापूर्वी, दक्षिणेतील अभिनेत्री कीर्ती सुरेशने तिच्या आईची ३० वर्ष जुनी साडी नेसली होती आणि इतक्या काळासाठी साडी जपण्याच्या तिच्या कलेचे कौतुकही केले होते. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टने तिच्या लग्नाची साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या लग्नात तिच्या आजीची साडी नेसली होती, तर यामी गौतमने तिच्या आईची साडी नेसली होती. त्याचप्रमाणे, दीपिका पादुकोणने तिच्या मेहंदी समारंभात मरून रंगाचा सूट घातला होता, जो तिने तिच्या वर्धापनदिनानिमित्त देखील पुन्हा परिधान केला.
काही दशकांपूर्वी महागडे कपडे खरेदी करणे ही दीर्घकालीन गुंतवणूक मानली जात असे. काही खास प्रसंगासाठी रेशीम, बनारसी इत्यादी महागडे कपडे कपाटाच्या एका खास कोपऱ्यात सुरक्षितपणे ठेवले जात होते. कारण यातून समृद्धीची भावना मिळते. फास्ट फॅशन त्या आनंदाची बरोबरी करू शकत नाही.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)