Freepik
लाईफस्टाईल

Health Care: तोंड येणे आणि मुखाचा कर्करोग या दोघांमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या लक्षणं

Ulcer and Oral Cancer: तोंड येणे किंवा अल्सर येणे आणि मुखाचा कर्करोग या दोघांमध्ये पटकन फरक समजत नाही. दोन्ही आजार धोकादायक आहेत. याचसाठी तुम्ही याची लक्षणं जाणून घेणे गरजेची आहेत.

Tejashree Gaikwad

१. तोंड येणे म्‍हणजे काय, त्‍याची कारणे व लक्षणे कुठली?

- तोंड येणे म्‍हणजे तोंडाच्‍या आतील भागात व्रण (अल्‍सर) येऊन त्‍यामुळे वेदना होणे किंवा असहय्य वाटू लागते. प्रामुख्याने गालाच्‍या आतील भागात, जिभेवर किंवा आतील भागामध्ये हे व्रण येतात. तोंड येण्याची सामान्‍य कारणे म्‍हणजे तणाव, पोषक घटकांचा अभाव (बी-१२ जीवनसत्‍व, फॉलिक ॲसिड, आर्यन), दात चावला जाणे, किंवा हार्मोन्‍समध्ये होणारे बदल, किंवा औषधोपचाराचे विपरीत परीणाम होऊन, यांमुळे तोंड येऊ शकते. योग्‍य उपचार घेतल्‍यास हे व्रण साधारणतः २ ते ३ आठवड्यांमध्ये बरे होऊ शकतात. वेदना, जळजळ होणे, तिखट पदार्थ खातांना त्रास होणे, गिळतांनाही त्रास उद्‌वणे अशी काही लक्षणे या आजारात दिसतात.


२. मुखाचा कर्करोग म्‍हणजे काय, त्‍याची कारणे व लक्षणे काय?

मुखाचा कर्करोग म्‍हणजे तोंडातील पोकळीत झालेली असामान्‍य वाढ. गुथळी येणे, सुज येणे, लाल किंवा पांढरे चट्टे पडणे, किंवा व्रण येणे अशी लक्षणे दिसू शकतात. उपचार घेऊनही साधारणतः २ ते ३ आठवड्यांमध्ये या तक्रारी दूर झाल्‍या नाहीत, तर पुढील वैद्यकीय तपासणी करणे आवश्‍यक ठरते.

कारणे

तंबाखूचे सेवनः जवळपास ९० टक्‍के रुग्‍णांमध्ये मुखाचा कर्करोग होण्यासाठी धुम्रपान किंवा तंबाखूजन्‍य पदार्थाचे सेवन (गुटखा, मिस्‍त्री, तंबाखूचे सेवन). मद्यमान हेदेखील तंबाखूइतकेच घातक ठरु शकते. याशिवाय दातांमुळे अयोग्‍यरित्‍या होणार्या जखमा, वारंवार होणारे आघात यांमुळेही मुखाचा कर्करोग होऊ शकतो.

योग्‍य निगा न राखणे: पौष्टीक आहाराचा अभाव, लठ्ठपणा किंवा असंतुलीत जीवनशैली.

एचपीव्‍ही संसर्गः जीभेचा कर्करोग होण्याच्‍या कारणांमध्ये खुप व्‍यक्‍तींसोबत शारीरीक संबंध किंवा शारीरीक संबंध ठेवण्याच्‍या चुकीच्‍या पद्धती.

लक्षणे

बरे न होणारे व्रण (अल्‍सर), लाल किंवा पांढरे चट्टे. वेदना व सातत्‍याने सुज राहाणे.

प्रगत टप्पे: गुंडाळलेल्या किनारी असलेले अल्सर, गालाच्‍या कर्करोगामध्ये थेट बाहेरील भागापर्यंत जखम पोहोचू शकते. जिभेच्‍या कर्करोगाच्‍या बाबतीत गिळण्यास त्रास व कानाच्‍या दिशेच्‍या भागात वेदना होणे. मानेत कठोरता, मानेची हालचाल करण्यात अडचणी येऊ शकतात. प्रारंभी वेदना नसल्‍यातरी आजार वाढतांना यासोबत वेदना होण्याचा धोका असतो.

३. तोंड येणे आणि मुखाचा कर्करोग यांच्‍यातील कुठली लक्षणे एकसारखी आहेत?

यामध्ये तोंड येणे आणि मुखाचा कर्करोग या दोन्‍ही आजारात व्रण (अल्‍सर) हे एकसारखे लक्षण आहे. परंतु उपचाराने हे व्रण कशा प्रकारे प्रतिसाद देतात त्‍यावर अवंलबून असते.

तोंड येणे- सामान्‍यतः तोंड आलेल्‍या रुग्‍णाने योग्‍य उपचार घेतले तर तो बरा होऊ शकतो. उदारणार्थ जीवनसत्‍वाच्‍या अभावामुळे व्रण आले असेल तर औषधोपचारांतून ही जीवनसत्‍वे देऊन कमतरता भरुन काढता येते. किंवा काही आघातामुळे व्रण झाले असेल तर त्‍याचे निदान व योग्‍य उपचार झाल्‍यावर व्रण बरे होऊ शकतात.

मुखाचा कर्करोग- लक्षणांवर आधारित उपचाराला फारसा प्रतिसाद मिळत नाही. जीवनसत्‍व देऊन किंवा अडथळा ठरणारे दात काढले किंवा दातांची रचना सुरळित केली, तरीदेखील व्रण जात नसेल तर सतर्क होण्याची आवश्‍यकता आहे.

साधारणतः ३ आठवड्यांपेक्षा जास्‍त कालावधी तर तोंडामध्ये व्रण (अल्‍सर) राहात असेल, तर अशा वेळी बायप्‍सी करुन कर्करोग आहे की नाही, याची खातरजमा करुन घेता येऊ शकते.

४. सहजासहजी लक्षात येतील अशी मुखाच्‍या कर्करोगाची लक्षणे कुठली? या लक्षणांना कसे ओळखायचे?

मुखाच्‍या कर्करोगाचे प्राथमिक स्‍तरावर निदान करायचे असेल नियमितपणे निरीक्षण करणे ही अत्‍यंत सोपी पद्धत आहे. दात घासतांना तोंडातील भागात काही असामान्‍यता जाणवल्‍यास सावध झालेले बरे असते. व्रण (अल्‍सर) येणे, असामान्‍य स्‍वरुपाची सुज, किंवा गालाच्‍या भागामध्ये फोड येणे (बुक्कल म्यूकोसा), जिभ, टाळू किंवा जिभेखालील भागात फोड आला असेल तरी सावध होणे गरजेचे होते. कठोर स्‍वरुपाचे फोड किंवा मानेवर आलेली सुज असू शकते. छोट्या स्‍वरुपाचे व्रण असूनही कान दुखत असेल किंवा डोकेदुखी वाटत असेल, तर डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतलेला योग्‍य राहिल.

छोट्या स्‍वरुपातील बदल म्‍हणजे लाल, किंवा पांढर्या स्‍वरुपाचे चट्टे, हेदेखील कर्करोगाची लक्षणे ठरु शकतात. प्राथमिक टप्यात तोंडामध्ये सामान्‍य वाटणारी जखम (पांढरे, लाल किंवा संमिश्र रंगाचे चट्टे) दिसत असल्‍याने, त्‍यांची तपासणी केली नाही तर त्‍यांचे कर्करोगात रुपांतर होण्याची भिती असते. त्‍यामुळे प्राथमिक स्‍तरावर निदान होणे अत्‍यंत महत्त्वाचे असते.

जर कर्करोग झालाय, अशी शंका असेल तर मानेच्‍या भागात गाठ आहे का, याची स्‍वयंतपासणी करता येऊ शकते. व तसे जाणवल्‍यास पुढे वैद्यकीय तज्‍ज्ञांच्‍या मार्गदर्शनाखाली अल्‍ट्रासोनेग्राफी सारखी तपासणी करुन खातरजमा करुन घेता येऊ शकते. अचानकपणे तोंडातून दुर्गंधी येणे, जास्‍त प्रमाणात लाळ येणे, किंवा झपाट्याने दात पडणे अशी काही लक्षणे मुखाच्‍या कर्करोगाची असू शकतात.

५. मुखाच्‍या कर्करोगाचे निदान व उपचार पद्धतींविषयी..

निदानः मुखाच्‍या कर्करोगात प्रामुख्याने बायप्‍सीच्‍या माध्यमातून निदान केले जाते. व्रणाचा आकार व खोली यानुसार बायप्‍सीचा (पंच, इन्‍सेशनल, एक्‍सेशनल) पर्याय निवडला जातो. हिस्‍टोपॅथोलॉजीच्‍या माध्यमातून निदान होते. इमेजिंगमध्ये प्रामुख्याने सौम्‍य स्‍वरुपाच्‍या पेंशींसाठी एमआरआय आणि हाडांचा सहभाग असेल तर सिटी स्‍कॅन्‍स, या माध्यमातून कर्करोगाचा स्‍तर जाणून घेता येऊ शकतो. छातीचा एक्‍सरेच्‍या माध्यमातून फुफ्फूसाची स्‍थिती जाणून घेता येते.

उपचारः शस्‍त्रक्रिया हा प्रमुख व सर्वात प्रभावी पर्याय उपचाराचा भाग म्‍हणून मुखाच्‍या कर्करोगासाठी उपलब्‍ध आहे. या माध्यमातून बरे होण्याची शक्‍यता बळावत असते. कमीत कमी चिरा देऊन केली जाणारी रोबोटिक शस्‍त्रक्रिया यामुळे जीवन जगण्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. रेडिएशन थेरेपी हा उपचार प्रक्रियेचा भाग असलेला एक पर्याय आहे. शस्‍त्रक्रिया करण्यापूर्वी केमोथेरेपीचा उपयोग करुन मोठ्या आकाराच्‍या गाठी आकसवण्याचा प्रयत्‍न केला जातो. व शस्‍त्रक्रियेनंतर काही वेळा रेडिएशनचा आधार घेतला जातो.

कर्करोगाच्‍या शाखेमध्ये आधुनिक स्‍वरुपाचे पर्याय उपलब्‍ध झाले असून, यामध्ये प्रामुख्याने टार्गेटेड थेरेपीज्‌ आणि इम्‍युनोथेरेपीज यांचा समावेश आहे. अशा उपचार पद्धतींमुळे मुखाच्‍या कर्करोगावर अत्‍यंत प्रभावी व आधुनिक पद्धतीतून उपचार करणे शक्‍य होते. अशा स्‍वरुपाचे उपचार आणि शस्‍त्रक्रिया, रेडिओथेरेपी अशा संयुक्‍त प्रयत्‍नांतून मुखाच्‍या कर्करोगाविरुध्दचा लढा जिंकता येऊ शकतो.

६. यासंदर्भातील अतिरिक्‍त व उपयुक्‍त माहिती.

मुखाच्‍या कर्करोगाचे प्राथमिक स्‍तरावर निदान झाल्‍यास ते टाळता येऊ शकते किंवा अशा स्‍वरुपाचा कर्करोग पूर्णपणे बरादेखील होऊ शकतो. दरम्‍यान भारतामध्ये ७० ते ८० टक्‍के प्रकरणांमध्ये कर्करोगाचे निदान हे उशिराने होते. त्‍यामुळे तंबाखूजन्‍य पदार्थांपासून असलेल्‍या धोक्‍याबाबत जनजागृती करण्यासह मुखाच्‍या कर्करोगाबाबत प्राथमिक स्‍तरावर होण्यासाठी जनजागृती अत्‍यंत महत्त्वाची आहे.

कर्करोगावर यशस्‍वी उपचार घेतल्‍यानंतर नियमित तपासणीदेखील अत्‍यंत महत्त्वाची ठरते. मार्गदर्शक तत्‍वांनुसार उपचार घेतल्‍यानंतर साधारणतः पुढील वर्षभराच्‍या कालावधीत दर दोन महिन्‍यांनी तपासणी करुन घेणे योग्‍य ठरते. दुसर्या वर्षी साधारणतः ३ ते ४ महिन्‍यांनी एकदा तपासणी करावी. तर तीन ते पाच वर्षे कालावधीत सर्वसाधारणपणे वर्षातून एकदा तर पुढील आयुष्यात दर पाच वर्षांनी एकदा तपासणी करुन घेणे योग्‍य राहाते.

सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे खुप महत्त्वाचे आहे. यामध्ये नियमित व्‍यायाम, ॲन्‍टीऑक्‍सिडंट, प्रोटीन, फायबरर्स असा सर्वसमावेशक आहार घेणे आणि सकारात्‍मक दृष्टीकोन ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रा. डॉ. राज नगरकर हे एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटर व हॉस्‍पिटलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व चीफ ऑफ सर्जिकल ऑन्‍कॉलॉजी ॲण्ड रोबॉटिक्‍स सर्व्हिसेस या पदावर कार्यरत आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी