लाईफस्टाईल

CT Scan: सीटी स्कॅन करण्याचे काय आहे महत्व? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Tejashree Gaikwad

Advanced Medical Science: आधुनिक आरोग्य सुविधा मिळण्यामध्ये सीटी स्कॅन किंवा कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, त्यामुळे लवकर निदान करणे शक्य होते. आधुनिक एक्स-रे आणि संगणकीय तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन, सीटी स्कॅन शरीराच्या तपशीलवार क्रॉस-सेक्शनल प्रतिमा तयार करतात. अंतर्गत अवयवांचे परीक्षण करण्याचा आक्रमक नसलेला एक मार्ग, यामुळे रोगांचे लवकर निदान होण्यामध्ये मदत मिळते, त्वरित आणि अचूक निदान झाल्याने रुग्ण आजारातून बाहेर पडण्याच्या शक्यतेमध्ये लक्षणीय वाढ होते. याबद्दल अधिक जाणून घेऊयात श्री सत्यकी बॅनर्जी, ग्रुप चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, ट्रीविट्रॉन हेल्थकेअर यांच्याकडून...

कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या आजारांचे लवकर निदान झाल्यामुळे योग्य उपचार सुरू करणे शक्य होते. लवकर निदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये सीटी स्कॅन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, फुफ्फुसाचा कर्करोग, जो त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे कठीण आहे, लो-डोस सीटी स्कॅनमुळे त्याचे निदान करणे सोपे जाऊ शकते, त्यामुळे रुग्णाचे आयुष्य वाढण्याच्या शक्यतेमध्ये भर पडू शकते. त्याचप्रमाणे, सीटी कोलोनोग्राफी किंवा व्हर्च्युअल कोलोनोस्कोपी, पॉलीप्स आणि ट्यूमरचे व्हिज्युअलायझेशन कोलोरेक्टल कॅन्सरचे लवकर निदान होण्यात मदत करते.

सीटी स्कॅनमुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, अॅन्युरिझम आणि रक्ताच्या गुठळ्या यांसारखे रक्ताभिसरण यंत्रणेचे आजार असल्यास तेही समजू शकतात. याव्यतिरिक्त, यामुळे पाठीच्या कण्याचे आजार, मूतखडा, अल्सरेटिव्ह कोलायटीस आणि सायनुसायटिस सारख्या दाहकतेशी संबंधित रोगांचे निदान करणे शक्य होते. एखादा आघात झाल्यास, सीटी स्कॅन मुळे डोके, सांगाडा आणि अंतर्गत अवयवांच्या जखमांचे मूल्यांकन लवकर करणे शक्य होऊन आपत्कालीन उपचार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळते.

सीटी तंत्रज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे त्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या 3डी प्रतिमा तयार करणे शक्य होते. आधुनिक सीटी स्कॅनरमध्ये स्पायरल पद्धतीने सातत्याने प्रतिमा काढणे शक्य होते, यामुळे जुन्या उपकरणांच्या तुलनेत शरीराच्या अंतर्गत संरचनांचे अधिक तपशीलवार चित्र स्पष्ट होते. यामुळे सूक्ष्म पातळीवरील विसंगती समजणे शक्य होते, कमी प्रगत इमेजिंग तंत्रामध्ये ज्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.

तसेच आपत्कालीन औषधोपचार करण्यासाठी सीटी स्कॅन करणे देखील महत्त्वाचे आहे. आघाताच्या बाबतीत, फ्रॅक्चर, अवयवांचे नुकसान आणि अंतर्गत रक्तस्त्राव यासारख्या अंतर्गत जखमांची त्वरित आणि तपशीलवार माहिती मिळते. आपत्कालीन उपायात मार्गदर्शन करण्यासाठी हे त्वरित आणि अचूक निदान महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे रुग्णांचे आयुष्य आणि बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.

प्रत्येक आरोग्यसेवा सुविधेमध्ये सीटी तंत्रज्ञान उपलब्ध असणे अनेक कारणांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे तपशीलवार निदान माहिती त्वरित मिळते, जे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक आहे. दुसरे म्हणजे, यामुळे गंभीर आजारात सातत्याने देखरेख करणे आणि काळजी घेणे शक्य होते, अचूक इमेजिंग माहितीच्या आधारे उपचार योजनांमध्ये योग्य ते बदल करणे शक्य होते. शेवटी, सीटी स्कॅनच्या सहज उपलब्धते मुळे नियमित तपासणीमध्ये मदत मिळते जेणेकरून आजारांचे वेळीच निदान होऊन आजार वाढण्याआधीच त्यावर योग्य उपाययोजना करणे शक्य होते.

सीटी स्कॅन मध्ये तपशीलवार हाय- रिझोल्यूशन प्रतिमा तयार करण्याची क्षमता असल्याने, सीटी स्कॅन नियमित स्क्रीनिंग आणि निदान प्रक्रियेतील महत्वाचे साधन झाले आहे. यामुळे लवकर रोग निदान करणे शक्य होत असल्याने वेळीच आणि प्रभावी उपचार करणे शक्य होते, रोग अधिक प्रगत आणि उपचारास कठीण टप्प्यात जात नाही, आणि त्यावर होणाऱ्या खर्चात बचत होते.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला