हवेतला गारवा वाढला की त्वचेवर त्याचा परिणाम लगेच दिसू लागतो. चेहऱ्यावर पांढरे डाग, कोरडेपणा, खरखरीतपणा आणि निस्तेजपणा ही सगळी लक्षणं थंडीने आणलेली त्रासदायक भेटच म्हणावी लागेल. या दिवसांत त्वचेचा ओलावा टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. अशावेळी आपण बाजारातील महागड्या क्रीम्स आणि मॉईश्चरायझर्सचा वापर करतो. पण त्याचे परिणाम फार काळ टिकत नाही. त्याऐवजी घरच्याघरी तुपापासून नैसर्गिक उपाय करणं त्वचेसाठी जास्त फायदेशीर ठरतं.
हे मॉईश्चरायझर बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी सोपे आहे. शुद्ध गाईचं तूप, बदामाचं तेल, कोरफड जेल, गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल.
तुपापासून नॅचरल मॉईश्चरायझर बनवण्यासाठी मोठ्या वाटीत तूप घेऊन त्यात बाकी सर्व घटक टाका आणि चमच्याने छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करा. तयार झालेलं हे मॉईश्चरायझर काचेच्या डब्यात साठवून ठेवा.
रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर हे तुपाचं मॉईश्चरायझर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. दिवसभरातून एकदा नियमित वापरल्यास त्वचा मुलायम, गुळगुळीत आणि हायड्रेट राहते.
तुपामध्ये असलेले नैसर्गिक फॅट्स त्वचेला आतून पोषण देतात, तर गुलाब पाणी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. कोरफड जेल आणि बदामाचं तेल त्वचेला मऊपणा देतात आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवतात.
थंडीच्या दिवसात फक्त वरून काळजी घेणं पुरेसं नसतं. तर, आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या. असा थोडा घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यास तुमची त्वचा संपूर्ण हिवाळाभर मुलायम आणि चमकदार राहील!