हिवाळ्याची चाहूल लागली की गरमागरम पदार्थांची क्रेझ एकदम वाढते. त्यात सर्वाधिक डिमांड असते ती हेल्दी आणि पटकन तयार होणाऱ्या टोमॅटो सूपला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती अशी ही रेसिपी थंडीमध्ये शरीराला उबही देते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. त्यासोबतच टोमॅटोमध्ये असलेलं लाइकोपीन, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराचे संरक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात पटकन तयार होणारे आणि हेल्दी असे टोमॅटो सूप हा उत्तम पर्याय ठरतो.
साहित्य :
टोमॅटो - ३ ते ४ (मध्यम आकाराचे)
कांदा - १ (चिरलेला)
लसूण - ४ ते ६ पाकळ्या
आले - थोडंसं, बारीक चिरलेलं
तेल - १ टेबलस्पून
काळी मिरी - ½ चमचा
मीठ - चवीनुसार
साखर - ½ चमचा (ऐच्छिक)
जिरेपूड - ½ चमचा
पाणी - १ कप
कोथिंबीर - सजावटीसाठी
कृती :
सर्वात आधी कुकर गरम करून त्यात थोडं तेल टाका.
टोमॅटो, कांदा, आले आणि लसूण घालून मध्यम आचेवर १०-१२ मिनिटं छान परतून घ्या.
टोमॅटो थोडेसे काळपट दिसले तर त्याचा फ्लेवर आणखी छान येतो!
आता त्यात जिरेपूड, काळी मिरी, मीठ आणि १ ग्लास पाणी घालून कुकरला २ शिट्या देऊन शिजू द्या.
शिजलेलं मिश्रण थोडं गार झाल्यावर मिक्सरमध्ये घालून एकदम मऊ पेस्ट तयार करा.
तयार सूप पुन्हा एका भांड्यात उकळा आणि वरून कोथिंबीर किंवा तुळशीची पानं टाका.
सर्व्ह करताना इच्छेनुसार क्रीम किंवा क्रुटॉन्स घालू शकता.
हे सूप चविष्ट तर आहेच, पण त्यातील नैसर्गिक पौष्टिकता थंडीमध्ये शरीराला आवश्यक ऊर्जा देते. कोणतेही क्रीम किंवा कॉर्नफ्लोअर न घालता तयार केलेले हे घरगुती टोमॅटो सूप आरोग्यासाठीही उत्तम!