लाईफस्टाईल

Winter Tips : थंडीचा आनंद घ्या बिनधास्त! सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

हिवाळ्यात थंडीचा आनंद घेताना आरोग्याचीही काळजी घ्या. सर्दी, खोकला, त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी आहार, कपडे आणि दिनचर्येत कोणते बदल करावेत, जाणून घ्या.

Mayuri Gawade

हिवाळा म्हटलं की गरमागरम चहा, स्वेटर, मऊ ऊन आणि थंडगार वातावरण यांची मजा काही औरच असते. पण या थंडीत अनेकदा सकाळी अंथरुणातून बाहेर पडावंसं वाटत नाही. कधी हात-पाय गार पडतात, तर कधी घसा खवखवणे, सर्दी, खोकला आणि त्वचा कोरडी पडण्याचा त्रास सुरू होतो. त्यामुळे हिवाळ्याचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बदलत्या तापमानाचा शरीरावर परिणाम होऊ नये आणि आजारपणापासून बचाव करता यावा, यासाठी रोजच्या दिनचर्येत काही छोट्या सवयी लावून घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊया, हिवाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी.

१. कपड्यांचे थर घालण्याला प्राधान्य द्या

थंडीपासून बचाव करण्यासाठी बाहेर जाताना एकाच जाड कपड्याऐवजी दोन ते तीन थरांमध्ये कपडे घाला. यामुळे शरीरातील उब टिकून राहण्यास मदत होते. विशेषतः सकाळी आणि रात्री बाहेर पडताना स्वेटर, मफलर आणि मोजे वापरा. कान, मान आणि डोके झाकले जाईल याचीही काळजी घ्या.

२. तहान लागली नाही तरी पाणी प्या

हिवाळ्यात अनेकांना उन्हाळ्याच्या तुलनेत कमी तहान लागते. त्यामुळे नकळत पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, थंडीच्या दिवसांतही शरीराला पुरेशा पाण्याची गरज असते. दिवसभर नियमित पाणी प्या. साधं पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर कोमट पाणी घेऊ शकता. तसेच आहारात सूप, वरण यांसारख्या द्रवपदार्थांचा समावेश करा.

३. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा

हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या. रोजच्या जेवणात डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते. केवळ शरीराला उष्णता मिळावी म्हणून अतिप्रमाणात मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

४. त्वचेचा कोरडेपणा टाळण्यासाठी काळजी घ्या

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडणे, हातापायांची त्वचा खरखरीत होणे आणि ओठ फुटणे अशा समस्या जाणवतात. यासाठी अंघोळ करताना खूप गरम पाणी वापरणे टाळा. कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळीनंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावा. ओठांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी लिप बामचा वापर करा.

५. थंडी आहे म्हणून व्यायाम टाळू नका

थंडीच्या दिवसांत अनेक जण व्यायाम किंवा मॉर्निंग वॉकला जाणं टाळतात. मात्र, शरीराची हालचाल सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. सकाळी ऊन पडल्यानंतर थोडं चालायला जा. घरच्या घरी स्ट्रेचिंग, योगासने किंवा हलका व्यायाम करा. यामुळे स्नायू सक्रिय राहण्यास मदत होते. मात्र, अतिथंड वातावरणात अचानक जोरदार व्यायाम करू नका.

६. स्वच्छतेच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका

हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारखे संसर्ग पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे हात नियमितपणे साबणाने धुवा. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाका. आजारी व्यक्तींच्या अगदी जवळचा संपर्क टाळा. घरात पुरेशी हवा खेळती राहील याचीही काळजी घ्या. गरज असल्यास फ्लूच्या लसीकरणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हिवाळ्याचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या सवयींमध्ये हे छोटे बदल केल्यास थंडीच्या दिवसांत शरीराची काळजी घेण्यास मदत होईल.

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर GTA 6 फोटो ट्रेंडची धूम! तुमचाही फोटो दिसेल व्हाइस सिटी पोस्टरसारखा; जाणून घ्या सोपी ट्रिक

UP Viral Video : घटस्फोट न घेताच दुसऱ्या लग्नाचा घाट; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात, पहिल्या पत्नीने उधळला डाव

Dombivli Crime : ७ वर्षांचं प्रेम संपलं अन् तरुणाचा संताप अनावर; पेट्रोल टाकून माजी प्रेयसीचं घर पेटवण्याचा प्रयत्न