महाराष्ट्र

गेल्या वर्षात रेबिजमुळे ३० जणांचा मृत्यू; चार वर्षांत संख्येत कमालीची वाढ

Swapnil S

स्वप्नील मिश्रा/मुंबई

रेबिजमुळे राज्यभरात प्रत्येक वर्षी मानवी मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी म्हणजेच २०२३मध्ये रेबिजमुळे तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला आहे. २०२२मध्ये ही संख्या २९ इतकी होती. मात्र २०१९मध्ये फक्त १० जणांचा मृत्यू झाला असतानाच, गेल्या चार वर्षांत रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे समोर आले आहे.

२०२०मध्ये २३ जणांना तर २०२१मध्ये १९ जणांना रेबिजमुळे आपले प्राण गमवावे लागले होते. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, सद्यस्थितीत रेबिज हा लक्षात येण्याजोगा आजार झाला असला तरी गेल्या पाच वर्षांत कुत्र्यांच्या चावण्यामुळे रेबिज आजार होण्याचा धोका कित्येक पटींनी वाढला आहे. वेडसर किंवा भटके कुत्रे, माकडे आणि मांजरीच्या चाव्यामुळे रेबिजचा धोका असतो.”

जागतिक आरोग्य महासंघाच्या (डब्ल्यूएचओ) मते, जगभरातील रेबिजच्या मृत्यूंचे प्रमाण भारतात ३६ टक्के इतके आहे. रेबिजची लागण झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून अथवा चावण्यातून हा आजार मनुष्यात प्रसारित होतो. कुत्र्यांच्या माध्यमातून होणाऱ्या रेबिजचे प्रमाण जगभरात वर्षाला ५९ हजार इतके आहे.

“भारतातील लक्षणीय विकृती आणि मृत्यूसाठी रेबिज जबाबदार आहे. अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप बेटांचा अपवाद वगळता, भारतातील प्रत्येक ठिकाणी या आजाराचे रुग्ण आढळतात,” असे एका तज्ज्ञ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्याचे माजी आरोग्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले की, “कुत्र्याने चावा घेतल्यानंतर लगेचच त्यावर शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेणे आवश्यक असते. सरकारी रुग्णालयात रेबिज प्रतिबंधक औषधे उपलब्ध असतात. कुत्र्याने घेतलेल्या चाव्याची तीव्रता लक्षात घेऊन, डॉक्टर त्यावर योग्य लसीचा डोस देऊ शकतात. लसीकरणाच्या गरजेकडे दुर्लक्ष करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा ते मनुष्याच्या जीवावर बेतू शकते. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर ती जखम वाहत्या नळाखाली १० ते १५ मिनिटे धुवून घ्यावी. त्यासाठी साबणाचा वापर करावा. त्यामुळे रेबिज होण्याचा धोका ८० टक्क्यांनी कमी होतो.”

लक्षणे दिसल्यास रेबिज घातक

जागतिक आरोग्य महासंघाच्या (डब्ल्यूएचओ) नुसार, रेबिज हा एक लस-प्रतिबंधात्मक विषाणूजन्य आजार आहे. एकदा रेबिजची लक्षणे दिसू लागल्यानंतर, हा आजार १०० टक्के घातक आहे. “रेबिजविषयी जनजागृती होत नसल्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. दोन वर्षांपूर्वी आम्ही रेबिजसाठी धोरण आखून, आमच्या स्टाफला उपचार देण्यासाठी किंवा त्याची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षित केले होते. आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागामध्ये योग्य समन्वय साधणे गरजेचे असून या आजाराविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे,” असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान