मुंबई : करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याच्या आदेशाविरुद्ध माझगाव सत्र न्यायालयात धाव घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना कोर्टाने दणका दिला आहे. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
शनिवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर करत आपणच मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा केला, पण मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला होता. करुणा यांची दोन्ही मुले माझी आहेत, पण त्या माझ्या पत्नी नाहीत, असे मुंडे म्हणाले होते. अखेर कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माझगाव कोर्टाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत फॅमिली कोर्टाने यासंबंधी दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तसे कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. त्यानंतर माझगाव कोर्टाने २९ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा यांनी शनिवारी आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी, मृत्युपत्र, स्वीकृतीपत्र आदी विविध दस्तावेज कोर्टापुढे सादर केले. त्यानंतर आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा केला होता. धनंजय मुंडेंचे अंतिम इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र ही दोन महत्त्वाची कागदपत्रे शनिवारी कोर्टासमोर सादर करण्यात आली. याच पुराव्यांच्या आधारे करुणा मुंडे यांना न्यायालयाने दिलासा दिला.
करुणा शर्मा मुंडे यांनी न्यायालयात लग्नासंदर्भातले धनंजय मुंडे यांचे स्वीकृतीपत्रही सादर केले. या पत्रात धनंजय मुंडे यांनी ९ जानेवारी १९९८ रोजी वैदिक पद्धतीने करुणा यांच्याशी लग्न केल्याचा उल्लेख आहे. तसेच आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन राजश्री यांच्यासोबत दुसरे लग्न केल्याचाही उल्लेख आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी मात्र हे स्वीकृतीपत्र खोटे असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळले.
माझ्याशी लग्न करणाऱ्याला २० कोटींची ऑफर - करुणा
दुसरीकडे, करुणा शर्मा यांनी कोर्टाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत. “मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीला धनंजय मुंडे यांनी २० कोटींची ऑफर दिली होती. मला हिरोईन होण्याची ऑफर होती, पण मी पतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. मला प्रेमात फसवून माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे २० कोटी रुपये देणार होते. मला व माझ्या मुलांना नेहमी धमकी दिली जाते,” असे आरोप त्यांनी यावेळी केले.
सत्याचा विजय होतोच - करुणा
समोर मंत्री असो वा कितीही ताकदवान व्यक्ती, आपली बाजू सत्याची असेल तर त्याचा विजय होतोच. न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व पीडित महिलांसाठी ऐतिहासिक असाच आहे, अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी कोर्टाच्या निकालानंतर दिली. त्या म्हणाल्या की, “आता धनंजय मुंडेंची आमदारकी घालवूनच शांत बसेन, तो माझ्यासाठी मोठा विजय असेल. धनंजय मुंडेंची पहिली बायको मीच आहे, हे न्यायालयात दुसऱ्यांदा सिद्ध झाले आहे.”