भाईंदर : मिरा रोडच्या जे पी नॉर्थ ह्या गृहसंकुलात बकरे आणण्यावरून झालेल्या गोंधळानंतर सोसायटीतील ४१ ते ५१ रहिवाश्यांवर महिलेच्या तक्रारीवरून बुधवारी पहाटे विनयभंग , दंगल आदी बाबत गुन्हा दाखल झाल्या नंतर आज सोसायटीतील ६३ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून त्या तक्रारदार महिलेचा पती मोहसीन खान वर विनयभंगाचा गुन्हा काशीमीरा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
बकरी ईद निमित्त घरात बकरे आणले त्यावरून मंगळवारी रात्री सदर संकुलात हिंदू धर्मिय रहिवाश्यांनी मोहसीन याची गाडी अडवून तपासणी केली तसेच बकरे बाहेर नेण्यास सांगून धक्काबुक्की केली, त्याच्या पत्नीचा हात धरून कपडे फाडले म्हणून ४१ ते ५१ रहिवाश्यांवर रहिवाश्यांवर गुन्हा दाखल झाला. रहिवाश्यानी मोठ्या संख्येने जमून जय श्रीराम च्या घोषणा देत हनुमान चालिसा म्हटलं. तणाव निर्माण होऊन त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम याना सुद्धा धक्काबुक्की केली.
रहिवाश्यांवर गुन्हे दाखल झाल्या नंतर रहिवाश्यांनी बुधवारी काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यां सोबत पोलीस ठाण्यात जमाव केला. अखेर एका ६३ वर्षीय महिलेच्या फिर्यादी नंतर मोहसीन वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन खान हे दहिसर विभागातील प्रभाग क्रमांक ८ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख असल्याचं सांगत आपल्या विरुद्ध खोटी तक्रार देण्या मागे कारस्थान असून इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांनी काढलेले व्हिडीओ सत्य स्पष्ट करतील असे म्हटले आहे.