महाराष्ट्र

नाशिकजवळ तिहेरी अपघातात, दोन दुचाकीस्वार ठार, ८ जखमी : पेटत्या बसमधील ४३ प्रवाशांचा जीव वाचला

प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर झालेल्या विचित्र भीषण अपघात घडला. ब्रेक फेल झाल्याने एसटी महामंडळाच्या बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. त्यानंतर थोड्याच वेळात बसने पेट घेतला. स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्व ४३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जिवीत हानी टळली; या दुर्घटनेत २ दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. तर, बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली.

राज्य परिवहन महामंडळाची एम एच १४ बीटी ३६३५ ही विठाई बस पळशे चौफुलीच्या बस थांब्यावर थांबली. तेथे त्यातून काही प्रवासी उतरत होते, त्याचवेळी पाठीमागून आलेली राजगुरुनगर-नाशिक (एमएच. ०७ सी ७०८१) या बसने थांब्यावर उभा असलेल्या विठाई बसला जोरदार धडक दिली. या दोन्ही बसच्या मधोमध उभे असलेले ३ दुचाकीस्वार या दोन्ही बसच्या मधे दाबले गेले. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी बसमध्ये अडकलेल्या दुचाकीला स्पार्किंग होऊन बसने पेट घेतला. तत्पूर्वी दोन बस एकमेकांवर आदळल्याने झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी बसकडे धाव घेतली. यावेळी, पुण्याहून आलेल्या बसमध्ये ४३ प्रवासी होते, या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी उपस्थितांनी त्या बसचा दरवाजा, खिडक्यांच्या काचा आणि मागील दरवाजा फोडून बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. दोन बसच्या धडकेमुळे बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाल्या. त्यांनी तातडीने बसची आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. राजगुरुनगर-नाशिक बसचे चालक राजेंद्र अंबादास उईके यांनी सांगितले, की,‘‘पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली.’’

ऑक्टोबर महिन्यातही बस जळाली

ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळच औरंगाबाद महामार्गावरील तपोवन येथे एका खासगी बसला असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार