महाराष्ट्र

वऱ्हाड निघालंय दावोसला..! आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिष्टमंडळाच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्री शिंदे सोबत ५० लोकांना घेऊन जाणार असून आधीच्या दौऱ्यात त्यांनी २८ तासांत ४० कोटींचा खर्च केला होता. आता फक्त सामंजस्य करारावर सह्या करण्यासाठी ५० लोकांना घेऊन जात आहेत. वऱ्हाड निघालंय लंडनला सारखे हे वऱ्हाड दावोसला घेऊन जात असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले असून १९ तारखेला आल्यानंतर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देऊ, तो देखील पुराव्यासकट, असे स्पष्ट केले आहे.

पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यात अनाठायी खर्च होत असल्याचा आरोप करत टीका केली आहे. खासदार, माजी खासदार खासगी एजन्सीज‌्ची माणसे, ओएसडी असा ५० जणांचा ताफा घेऊन मुख्यमंत्री चालले आहेत. तिथे फक्त मुख्यमंत्री सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. असे असताना इतके मोठे शिष्टमंडळ कशाला, असा सवाल करताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या परदेश दौऱ्यासाठी परराष्ट्र मंत्रालय तसेच वित्त विभागाची परवानगी लागत असते. या दौऱ्यासाठी फक्त १० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. असे असताना या दौऱ्यात इतक्या लोकांचा समावेश कशासाठी. ज्यांना गुवाहाटीला घेऊन जाता आले नाही, त्यांना घेऊन जाताय का, असा खोचक प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी केला.

‘‘या शिष्टमंडळात कोणत्याही उद्योगपतीचा समावेश नाही. यात काही दलालांचा समावेश असल्याचेही समजते. यावर केंद्र सरकारचा अंकुश आहे की नाही. परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती आहे की नाही. जरी स्वखर्चाने काही जण जाणार असतील तरी त्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला असणे आवश्यक असते. इतक्या लोकांना परवानगी देण्यात आली आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

प्रत्येक रुपयाचा हिशोब देऊ -उदय सामंत

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप खोडून काढले आहेत. दौऱ्यावरून आल्यानंतर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब महाराष्ट्रातील जनतेला आपण देणार आहोत, ते देखील पुराव्यासकट. आजचे जे आकडे दिले जात आहेत, ते फक्त मनोरंजन म्हणून पहावेत. यांच्या काळात चांगले एमओयू झाले नाहीत. आमच्या काळात होत आहेत, हे दु:ख आहे. ज्यांनी पोलिसांकरवी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवले, त्यांनी किती जणांचे शिष्टमंडळ असावे, याचे मार्गदर्शन करू नये. जागतिक पातळीवर महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी कोणी आपल्या खिशातून पैसे खर्च करत असेल तर त्यात वाईट काय आहे, असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

Marathi Serial: लोकप्रिय मालिका 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' प्रेक्षकांपुढे येणार नवीन अवतारात!