मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडला गुरुवारी भेट दिली. कर्जत जामखेडमध्ये एम आयडीसी का आली नाही, या शब्दात यावेळी अजित पवार यांनी राम शिंदे यांच्या दाव्याचा फुगा फोडला, याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार हे परखड व स्पष्ट वक्ते आहेत, या शब्दात रोहित पवार यांनी दादांचे कौतुक केले. कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास कामांसाठी अजित पवार यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे, असेही रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती गुरुवारी पुन्हा एकदा जामखेडमध्ये आली. अजितदादांनी तोंडावरच प्रा. राम शिंदे यांच्या दाव्याची पोलखोल केली आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवसआधी केवळ मतांसाठी कर्जत - जामखेड साठी ‘खांडवी - कोंभळी’ एमआयडीसी मंजूर करुन आणल्याचे गाजर राम शिंदे यांनी दाखवले आणि स्वतःची पाठही थोपटून घेतली होती. पण जामखेडमध्ये बोलताना कर्जत - जामखेड मध्ये एम आयडीसी का आली, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत जामखेडसाठी तुम्ही कोट्यवधी रुपये निधी दिल्याचा उल्लेखही दादा आपण यावेळी केलात. दादा तुम्ही हे खरंच सांगितलं आणि मलाही ते मान्य आहे, याबाबत माझ्या कर्जत - जामखेडकरांच्या वतीने मी आपला कायम आभारी आहे. विकासकामांच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करणारे अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळे यापुढेही आपण विकास कामांसाठी कोणताही भेदभाव करणार नाहीत, असा विश्वास आहे.
- आ. रोहित पवार