छगन भुजबळ
अत्यंत धक्कादायक... मन सुन्न करणारी आणि कदापि विश्वास न बसणारी ही बातमी आहे. बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि पायाखालची जमीनच सरकली. नियती इतकी क्रूर असू शकते, याचा विचारही कधी केला नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं ‘अजितपर्व’ अशा प्रकारे अकाली शांत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने आज हे वास्तव स्वीकारण्याची वेळ आपल्यावर आली असून, व्यक्तिगत मला स्वतःलादेखील या धक्क्यातून सावरणं खूप कठीण जाणार आहे.
अजितदादा आणि माझे नाते केवळ राजकीय सहकाऱ्यांचे नव्हते, तर ते त्या पलीकडचे होते. सन १९९९ मध्ये जेव्हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दादांचा तो स्पष्टवक्ता स्वभाव आणि "कामाचं बोला" म्हणण्याची त्यांची आग्रही पद्धत प्रशासनाला शिस्त लावणारी होती. दादांच्या कार्यशैलीची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असायची. ते रोज पहाटे ५ वाजता उठून कामाला लागत असत. सूर्योदयाच्या वेळी जेव्हा जग जागे होत असते, तेव्हा दादांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली असायची. सकाळी लवकरात लवकर जनतेच्या सेवेत हजर होणे आणि लोकांचे प्रश्न जागेवर निकाली काढणे, हा त्यांचा शिरस्ता होता. अशा कार्यतत्पर आणि शब्दाला जागणाऱ्या लोकनेत्याचे जाणे ही राज्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे.
दादांच्या विकासकामांवर बारामतीच्या जनतेने विश्वास ठेवला आणि बारामती मतदारसंघातून विधानसभेवर १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४, २०१९,२०२४ मध्ये आमदार म्हणून निवडून आले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि ऊर्जामंत्रीही होते. पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते पवारसाहेबांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यानंतर आमच्या आघाडीचे सरकार असताना म्हणजे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रिपदे व सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर दादा राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आता महायुती सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्रीपदी काम करत होते. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा सपाटा सुरू केला होता.
लोकांना दादांची कडक शिस्त आणि दरारा माहिती होता, पण मी दादांचा हळवा आणि संवेदनशील स्वभाव जवळून पाहिला आहे. २०१४ नंतरच्या काळात जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग ओढवला होता, तेव्हा दादांनी वेळोवेळी दिलेला धीर आणि भुजबळ कुटुंबाच्या पाठीशी उभी केलेली ताकद मी कधीही विसरू शकणार नाही. अगदी गेल्या वर्षी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची प्रचंड धावपळ सुरू असताना, केवळ माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून दादा आवर्जून थेट नाशिकला आले होते. कामाचा एवढा व्याप असतानाही नात्यातील ओलावा जपणारा असा हा दिलदार माणूस होता. मतभेद अनेकदा झाले असतील, पण मनात कधीही कटुता न ठेवता माझ्या ज्येष्ठत्वाचा त्यांनी कायम सन्मान केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारपुढे अनेक संकटे आली पण सर्वात मोठं संकट हे कोरोनाचे होते. त्याचबरोबर अवकाळी पाऊस, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, अतिवृष्टी अशी अनेक संकटे मधल्या काळात आली पण मुळातच जनतेचे कल्याण या उद्दिष्टाने एकत्र आलेल्या आमच्या सरकारने सर्व संकटांशी दोनहात केले. या सर्वात राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी कोणत्याही विभागाचा अर्थपुरवठा थांबवला नाही. राज्याचे अर्थचक्र चालू रहावे यासाठी सातत्याने प्रयत्न करताना अजित पवार यांनी राज्याच्या जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले. कोरोनाचा मुकाबला करताना राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्याच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली. कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडल्याने आर्थिक वर्षात विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लागण्याची शक्यता असताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी निधी वितरित करताना नाशिक जिल्ह्यासाठी हात काहीसा सैल सोडला आणि नाशिक जिल्ह्याला भरघोस निधी दिला.. शासनाने 'ब्रेक दि चेन' अंतर्गत प्रतिबंधाच्या काळात आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. प्रतिबंधाच्या कालावधीत गोरगरीबांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला. राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मोफत शिवभोजन थाळीचा निर्णय तर सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा होता. यासाठी देखील अजित पवार यांनी भरघोस निधी देण्याची तयारी दाखवली. एखादा लोककल्याणकारी काम जर दादांना सुचले तर त्या कामाला पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत बसत नाहीत याचा मला अनुभव आहे. अजितदादा राज्याचे ऊर्जामंत्री असताना, महावितरणमध्ये 'लाइन वूमन' म्हणून महिलांना संधी देण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला. त्यावेळी भरती केलेल्या मुली, लाइन वूमन म्हणून आज मुलांपेक्षाही चांगलं काम करत आहेत. अजितदादा हे केवळ एका भागाचे नेते नव्हते, तर सर्वसमावेशक विचार करणारे नेतृत्व होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी ११ वेळा अर्थसंकल्प मांडून महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनाला नवी दिशा दिली. आधुनिक पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे शिल्पकार होते. मंत्रिमंडळात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असो किंवा बहुजन समाजाच्या विकासाचे प्रश्न, दादांनी नेहमीच अत्यंत ठाम भूमिका घेतली. प्रशासकीय गुंता सोडवून वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा शब्द नेहमीच मैलाचा दगड ठरला. राजकारणात दादांची ओळख 'शब्दाचा पक्का माणूस' अशी होती, पण दादा, आज न सांगता अशा प्रकारे कायमची एक्झिट घेऊन तुम्ही मात्र तुमचा शब्द मोडलात आणि आम्हाला अर्ध्या वाटेवर पोरकं करून निघून गेलात. 'पॉवरहाऊस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुमच्या ऊर्जेची उणीव या राज्याला सदैव भासत राहील.
अजित पवार “दादा” नावाने ओळखले जाणारे हे शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि सामान्य माणसाचे विशेष नेतृत्त्व होते. त्यांच्या कामाचे स्वरूप केवळ राजकीय शहाणपणापुरते सीमित नव्हते; ते लोकांच्या दुःखांमध्ये सामील होऊन सोबत चालले. त्यांनी राज्याच्या विकासाचे निर्णय, आर्थिक नियोजनातले दूरदर्शी विचार, आणि शासनाच्या विविध विभागांतील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्याची त्यांची क्षमता हे सगळे आज महाराष्ट्राच्या जनमानसात शोक आणि अभिमान दोन्ही भावनिक तडाख्यांसह राहतील.