मंत्रिमंडळाच्या बैठकीत उशीरा येणे, राष्ट्रवादीच्या जनता दरबारात गैरहजर राहणे, अशा विविध कारणांवरून राष्ट्रवादी पक्षाचे नेते मंत्री माणिकराव कोकाटे यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी कानउघाडणी केली. बेशिस्त वागणुकीवरूनही अजितदादांनी कोकाटेंना खडे बोल सुनावल्याची जोरदार चर्चा आहे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ बंगल्यावर दर मंगळवारी बैठकीचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे मंगळवार, ८ एप्रिल रोजी ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला कोकाटे उशीरा पोहोचले. त्यानंतर अजित पवार यांनी कोकाटे यांना धारेवर धरत कानउघाडणी केली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांनादेखील एकदा-दोनदा चूक झाली, तर समजून घेऊ...मात्र तिसऱ्या वेळी माफी नाही. मग नंतर मंत्रिपदच बदलू, असा सज्जड दम अजित पवारांनी या बैठकीत दिल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.