धनंजय कवठेकर/ अलिबाग
अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मध्ये तिरंगी लढत रंगणार असून, महायुती व शेकाप-काँग्रेस आघाडीसमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आव्हान उभे केले आहे.
शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख संदीप पालकर आणि श्वेता पालकर यांनी सोमवारी मोठ्या जल्लोषात, शक्तिप्रदर्शनासह आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या तनुजा पेरेकर यांनी सोमवारी वाजतगाजत मिरवणुकीसह उमेदवारी अर्ज दाखल केला. नगरसेवक पदांसाठी महायुतीचे सर्व उमेदवार उत्साहात अर्ज दाखल करताना दिसले. अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत दुसरीकडे शिवसेना-भाजप महायुतीनेही जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
या मिरवणुकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार विक्रांत पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांसह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचा थेट सामना यावेळी शेकाप-काँग्रेस आघाडीसोबत होणार आहे.
मागील पाच वर्षांत पालकर दांपत्यांनी केलेल्या कामांमुळे मतदार स्वतःहून साथ देत आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख
अलिबागच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी आणला असून त्याचा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे परिवर्तनासाठी यंदा अलिबागकर महायुतीला साथ देतील.महेंद्र दळवी, आमदार