धनंजय कवठेकर/अलिबाग
रायगड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष महिला उमेदवारांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईकच्या रूपाने नवीन चेहरा मैदानात उतरवत आघाडी घेतली आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार असून, महाविकास आघाडी विजयासाठी सज्ज असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी शेकापच्या अक्षया नाईक, तर वॉर्ड क्रमांक ५ मधून काँग्रेसचे समीर ठाकूर आणि वॉर्ड क्रमांक ७ मधून अभय म्हामुणकर यांची उमेदवारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी जाहीर केली.
अवघ्या २२ वर्षांच्या अक्षया नाईक ही सुशिक्षित, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू तरुणी असून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत असतानाच समाजकारणाची ओढ तिने जपली आहे. अक्षया नाईक पक्षाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होत असून महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा या विषयांवर तिने ठोस भूमिका घेतली आहे. पहिल्यांदाच राजकारणात पाऊल ठेवतानाही त्यांचा आत्मविश्वास, प्रामाणिक दृष्टिकोन आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द यामुळे त्या स्थानिक मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शेकापने त्यांच्या हातात उमेदवारीची धुरा सोपवून तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देणारा निर्णय घेतला असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. अक्षया नाईक यांच्या माध्यमातून पक्षाला तरुणाईचा जोम आणि महिलांच्या सहभागाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.