महाराष्ट्र

अलिबागचा पांढरा कांदा यंदा लवकर बाजारात; कांद्याला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

Swapnil S

धनंजय कवठेकर/अलिबाग : रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या सात ते आठ दिवसांत हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. निसर्गाने साथ दिल्याने दरवर्षीच्या तुलनेत कांदा यंदा लवकर बाजारात येणार आहे.

अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या चार गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पीक घेतले जात असे. त्यानंतर अलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड होऊ लागली आहे. पूर्वी १०० हेक्टरवर या कांद्याची लागवड होत असे, मात्र वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र २४५ हेक्टर पर्यंत विस्तारले आहे.

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते; मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिकं घेतली जात नाहीत. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. पण अलिबाग तालुका त्याला अपवाद ठरतो. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात.

यंदा अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांना त्रास दिला नाही. त्यामुळे पुनर्लागवड करावी लागली नाही. कांद्याच्या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भावही झाला नाही. यामळे यंदा कांद्याचे पीक जोमात आले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दाखल होणारा कांदा यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळण्याचीही आशा शेतकऱ्यांना आहे. सध्या काढणीचा हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांनी कांदा वाळण्यासाठी ठेवला आहे. नंतर वेण्या बांधून कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवला जाणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस