संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांची मांदियाळी; हरिनामाचा गजर अन् टाळ-मृदुंगाच्या गजरात अवघी दुमदुमली पंढरी

‘जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा, गंगा तेव्हा होती चंद्रभागा’ असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागेच्या तिरी आषाढी देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी दाखल झाला आहे.

Swapnil S

पंढरपूर : ‘जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा, गंगा तेव्हा होती चंद्रभागा’ असे अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागेच्या तिरी आषाढी देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी दाखल झाला आहे.

वाखरी येथील उभे रिंगण पार करून विठ्ठल नगरीतील पंढरपूरच्या वेशीवर उभ्या असलेल्या संतांच्या पालख्या मंगळवार दुपारपासूनच पंढरीत दाखल होत आहेत. देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे पंधरा ते सतरा लाख वैष्णव भाविकांनी हजेरी लावली आहे. हरिनामाचा गजर अन् टाळ-मृदुंगाच्या निनादात अवघी पंढरी नगरी दुमदुमली असून पंढरीच्या चंद्रभागा वाळवंटासह प्रदक्षिणा मार्ग आणि भक्ती मार्गावर हातात वैष्णवांची पताका घेऊन वारकरी भाविक हरिनामाचा गजर करीत आहेत.

देवशयनी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनानेही भाविकांच्या सोयीसुविधांसाठी मोठी तयारी केली असून महत्त्वाच्या खात्याचे सर्व मंत्री पंढरपुरात दाखल झाले आहेत. प्रत्येकजण विविध ठिकाणी पाहणी करत असून पंढरपुरात वारकऱ्यांना राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. यंदा चार ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरे उभारण्यात आली असून या माध्यमातून वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी आणि त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या मोफत बॉटल, मँगो रस तसेच खाद्यपदार्थ वाटप होत आहे.

मंदिर समितीकडूनही दर्शन रांगेतील वारकरी, भाविकांना मोफत मसाले भात आणि खिचडीचे वाटप होत आहे. सध्या संपूर्ण पंढरपूर भगव्या पताका आणि विठू माऊलीच्या गजराने दुमदुमून गेला आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांबरोबरच व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने थाटली आहेत. भाविकही प्रासादिक वस्तू, टाळ, मृदुंग, विणा, पखवाज आदींच्या सहाय्याने आषाढी यात्रेच्या सोहळ्याचा आनंद घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून भाविकांसाठी मोफत फराळ, भोजन

राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून वारकरी भाविकांसाठी मोफत फराळ आणि भोजनाचे चार ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी यात्रेपूर्वी सर्व महत्त्वाच्या ठिकाणाची तसेच मोफत अन्नछत्राच्या ठिकाणाची पाहणी केली होती.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी