महाराष्ट्र

पीओपी मूर्तींवर बंदी घाला; मूर्तीकाराच्या कलेवर नको!

राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे अंमलबजावणी होत नाही, मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांच्याशी खास बातचीत

गिरीश चित्रे

पीओपीच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाचा रास होत असून समुद्र जीव धोक्यात आहे. पीओपी गणेशमूर्तींवर बंदीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र राज्य सरकारच्या इच्छाशक्तीचा अभाव असून राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे अंमलबजावणी होत नाही, असे मत मुंबई मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष वसंत राजे यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना व्यक्त केले. दरम्यान, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीच्या मूर्ती काळाची गरज असून मूर्तिकाराकडून स्वागत आहे.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती काळाची गरज आहे. मुंबई महापालिकेनेही यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना २ ते ४ फूट उंच व शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं असावी, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत ३५०हून अधिक मूर्तिकारांमध्ये शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती साकारण्याची क्षमता आहे. मात्र पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात राज्य सरकारचा वेळकाढूपणा कारणीभूत आहे, अशी टीका वसंत राजे यांनी केली आहे. राज्य सरकारच्या चालढकल धोरणामुळे पीओपीच्या गणेश मूर्तीं निर्मिती करणाऱ्यांचे फावते, असा आरोप ही त्यांनी केला. दरम्यान, मुंबईत शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्या मूर्तिकारांची कला जिवंत ठेवण्यासाठी तरी राज्य सरकारने पाऊल उचलावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी २००८ मध्ये लागू केली आहे. केंद्र व राज्य सरकारने यावर मार्गदर्शक सूचना जाहीर करा, असे निर्देश दिले होते. तर मूर्ती कशा प्रकारे बनवावी, विसर्जन कशा प्रकारे करावे याबाबत केंद्रीय पर्यावरण प्रदूषण मंडळाने २०१० मध्ये नियमावली जाहीर केली. २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा आदेश देत पीओपी गणेश मूर्तींवर बंदी लागू करा, असे स्पष्ट केले. मात्र पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात राज्य सरकारची उदासीनता दिसून येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन लाखांहून अधिक मूर्तींची गरज असते. मुंबईत ६० ते ७० हजार गणेशमूर्ती बनवण्यात येतात. त्यामुळे उर्वरित सव्वा लाख शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं आणणार कुठून, असा सवाल गणेश मूर्तींकरांनी उपस्थित केला. पेण, पनवेल या ठिकाणांहून मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवात दीड लाख पीओपीच्या गणेश मूर्तीं विक्रीसाठी येत असतात. परंतु यंदा पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालत असून मुंबईबाहेरुन येणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तीं रोखण्यासाठी लवकरच पोलिसांबरोबर बैठक असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. पर्यावरणास हानीकारक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी घालण्यात आली असून न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे.‌ मात्र राज्य सरकार या विषयी गंभीर नसल्याने पीओपी गणेशमूर्तींवर बंदीची अंमलबजावणी होत नाही, असेही राजे यांनी सांगितले.

पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने घरगुती भक्तांना केले आहे. घरगुती गणेश मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिक नसावी, असेही स्पष्ट केले आहे. मुंबईत दोन लाखांहून अधिक घरात बाप्पाची स्थापना होते. मुंबईतील मुर्तिकार ६० ते ७० हजार गणेश मूर्ती साकारतात. परंतु राज्य सरकारच्या आदेशानुसार मुर्तिकारांना मापक दरात जागा उपलब्ध करुन दिली, तर शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारता येतील, असे वसंत राजे यांनी सांगितले. तसेच पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घातली तर मुर्तिकार ही राज्य सरकार व मुंबई महापालिकेला संपूर्ण सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.

२ फूट उंच गणेश मूर्तीं साकारण्यासाठी १३ किलो माती लागते. मुंबईत दोन लाखांहून अधिक घरात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे दोन लाख गणेश मूर्तीं साकारण्यासाठी २,७०० टन माती लागणार आहे. मुंबई महापालिकेने माती उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी प्रत्येक झोनच्या अधिकाऱ्यांना शाडूची माती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले आहेत.

मातीकाम करणारा हाच एकमेव मूर्तिकार

पीओपी ओतकाम करणारा हा कारागीर असतो आणि तो उदरनिर्वाहासाठी कोणत्याही माध्यमात काम करू शकतो. एक पीओपी ओतकाम करणारा कारागीर हा आठ तासांत १२ पीओपी मूर्ती ओतकाम करतो. तर मातीचे दाबकाम करणारा कारागीर आठ तासात फक्त चारच मूर्ती तयार करतो. म्हणजे १२ मूर्ती तयार करायला ३ कारागीर लागणार. याचाच अर्थ जर न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्णपणे पीओपी मूर्ती बंदी केल्यास येथे रोजगाराची अधिक संधी उपलब्ध होऊन वर्षभरासाठी रोजगार उपलब्ध होईल. शिवाय मूर्तिकार ही घडतील.

... तर मूर्तिकार घडतील!

पीओपीच्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानीकारक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. त्याची राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत नाही, ही मोठी खंत आहे. मुंबईत मातीच्या गणेश मूर्तीं साकारणारे ३५० मूर्तीकार आहेत. या मूर्तिकारांना अनुकूल वातावरण मिळाले तर त्याच्या कलेच्या शिकवणीतून नवीन मूर्तिकार घडतील, असा विश्वास राजे यांनी व्यक्त केला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?