महाराष्ट्र

बारामतीत प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात; लँडिंगवेळी धावपट्टीवरून घसरले, Video

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. विमानाची पाहणी करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.

किशोरी घायवट-उबाळे

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ रविवारी (दि. ९) दुपारी खासगी कंपनीच्या प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झाला. लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून घसरून काही अंतरावर कोसळले. दुपारी सुमारे १२.३० वाजता ही घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशिक्षणार्थी वैमानिकालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "बारामती विमानतळावर प्रशिक्षणादरम्यान एक शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली असून या विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि अभिजित जुंद्रे हे होते. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही."

तांत्रिक बिघाडामुळे अपघात?

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता का किंवा अन्य काही कारणामुळे अपघात झाला, याचा तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

ग्रामस्थांसह मदत पथके घटनास्थळी

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि आपत्कालीन मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. विमानाची पाहणी करण्यात आली असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही तपास सुरू असल्याने सध्या कोणतेही ठोस कारण सांगणे घाईचे ठरेल, असे स्पष्ट केले.

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर पुन्हा अपघात

बारामती विमानतळाजवळील या अपघातामुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेची आठवण झाली. Learjet 45 या विमानाचा बारामतीजवळ अपघात झाला होता. या दुर्घटनेत महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांचे दोन सहकारी आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झाला होता.

विमान वाहतूक सुरक्षेवर भर

दरम्यान, देशातील विमान वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. विमान प्रवाशांची सुरक्षा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

गेल्या वर्षी DGCAकडून Enhancing Aviation Safety through Collaboration या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA), DGCAचे वरिष्ठ अधिकारी, विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी झाले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट