महाराष्ट्र

भाजपला राम मंदिराचे राजकारण करायचेय की व्यवसाय, त्यांनाच ठाऊक! शरद पवार यांची बोचरी टीका

प्रकाश आंबेडकर यांच्‍या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्‍हावा, ही सर्वांचीच इच्‍छा आहे

Swapnil S

अमरावती : अयोध्‍येत राम मंदिर उभारले गेले, त्‍याचा आपल्‍याला आनंद आहे. पण, भाजप राम मंदिराचे राजकारण करीत आहे की व्‍यवसाय, हे त्यांनाच ठाऊक, अशी बोचरी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

पवार म्हणाले, ‘‘अयोध्‍येतील रामलल्ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे निमंत्रण आपल्‍याला मिळालेले नाही. साधारणपणे पूजा-अर्चा ज्‍या ठिकाणी होते, त्‍या ठिकाणी मी सहसा जात नाही. प्रत्‍येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्‍याला आपला विरोध नाही. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले की नाही, हे आपल्‍याला माहीत नाही, असे पवार यांनी सांगितले.

‘‘नुकत्‍याच झालेल्‍या चार राज्‍यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेनुसार लागलेले नाहीत. पण, त्‍यामुळे आम्‍ही नाउमेद झालो नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी एकत्रपणे लढली, तर देशात सत्ता परिवर्तन शक्‍य आहे, असा दावा पवार यांनी केला. इंडीया आघाडीने आगामी निवडणुकीला एक‍त्रितपणे सामोरे जाणे आवश्‍यक आहे. बसप नेत्‍या मायावती यांना आघाडीत सहभागी करून घेण्‍याविषयी समाजवादी पक्षाचा वेगळा दृष्टिकोन आहे. त्‍यांना बाजूला सारून वेगळा निर्णय घेण्‍याची गरज नाही. प्रकाश आंबेडकर यांच्‍या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश व्‍हावा, ही सर्वांचीच इच्‍छा आहे. त्‍यावर चर्चा सुरू आहे. सकारात्‍मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे पवार यांनी सांगितले.

‘‘संसदेत शिरून गॅस नळकांड्या फोडण्‍याची घटना घडल्‍यानंतर या गंभीर विषयावर चर्चा व्‍हावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. पण त्‍यावर चर्चा न करता लोकसभा आणि राज्‍यसभेच्‍या १४६ खासदारांना निलंबित करून मोदी सरकारने दडपशाही केली. सरकारला माहितीच द्यायची नाही. विरोधकांच्‍या अनुपस्थितीत तीन महत्त्वाची विधेयके पारित करण्‍यात आली, त्‍यावर चर्चा होणे आवश्‍यक होते. हा अत्‍यंत गंभीर मुद्दा आहे,’’ असे पवार म्‍हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी महाराष्‍ट्रात मी अध्‍यक्ष असलेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील शिवसेनेची बैठक होणार आहे. त्‍यात चर्चा होऊन जागा वाटपाचे सूत्र ठरेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

बदल हवा असल्यास

जनता वेगळा निर्णय घेते

इंडिया आघाडीच्‍या पंतप्रधानपदाच्‍या चेहऱ्याबाबत शरद पवार म्‍हणाले की, आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा आधी ठरवणे आवश्‍यक नाही. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांच्या आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरला नव्हता. निवडणुकीच्या निकालानंतर मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यावेळीदेखील असे म्हटले जात होते की, विरोधकांचे नेतृत्व कोण करणार, हे ठरले नाही. पण, जनतेला बदल हवा असेल तर ते वेगळा निर्णय घेतात, असे पवार म्‍हणाले.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर