शेखर धोंगडे/कोल्हापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ४ जी संपृक्तता प्रकल्प हा देशातील प्रत्येक गावात ४ जी सेवा मिळावी, यासाठी अंमलात आणला गेला होता. याचाच भाग म्हणून कोयनासारखा दुर्गम परिसर फोर-जी नेटवर्कनी जोडण्यासाठी केबलचे जाळे विणले गेले आहे. यावर कोयना परिसरातील जवळपास ७ मोबाईल टॉवर व हजारो ग्राहक निर्भर आहेत. मात्र सातारा जिल्हा बीएसएनएल ही शासकीय दूरसंचार संस्था आपल्या उद्दिष्टांशी फारकत घेत असल्याचे उघडपणे निदर्शनास येत आहे. जवळपास कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्ग १६६-ई ठेकेदाराला फक्त समजपत्र दिल्याने सातारा बीएसएनएलची मोबाईल सेवेची मानसिकता दिसून येत आहे.
मुळात कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन प्रादेशिक विभागांना जोडला जाणारा कराड - चिपळूण हा १६६-ई राष्ट्रीय महामार्ग सध्या अपूर्ण अवस्थेतच आहे. २०१७ साली प्रत्यक्ष सुरुवात झालेल्या या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. पूर्वी बांधकाम क्षेत्रातील अग्रणी एल. अँड. टी. कंपनीने कराड ते संगमनगर धक्का अशा महामार्ग रुंदीकरणास सुरुवात केली होती मात्र अनेक प्रशासकीय तसेच स्थानिक समस्यांना तोंड न देता कंपनीने आपला गाशा गुंडाळला. आता या प्रकल्पाचे १३ कि.मी. अर्धवट रुंदीकरणाचे काम ‘ऑल ग्रेस’ कंपनी करत आहे. दोन वर्षांपूर्वी बीएसएनएल कंपनीने कराड - चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस जमिनीखाली नवीन दर्जेदार केबल टाकली होती. कोयना सारख्या दुर्गम भागातील गावागावात मोबाईल नेटवर्क पोहचत मोबाईल क्रांतीनंतर काही गावांना लाभ मिळाला.
मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण कोयना विभागात बीएसएनएल मोबाईल सेवा पूर्णता: विस्कळीत झाल्याने स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे कोयना धरण व कोयना धरणावरील पोलीस सुरक्षा केंद्रास देखील याचा फटका बसत आहे. कोयना विभागासारख्या डोंगरी भागातील लोकांच्या सुविधांसाठी अनेक महा-ई-सेवा केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. मात्र नागरिकांना दिवसभर ताटकळत बसत सायंकाळी पदरमोड करून विना दाखले व उतारे माघारी फिरावे लागत आहे.
‘रिचार्ज’ ची भरपाई मिळणार का?
कोयना विभागातील महाराष्ट्र बँक, सातारा जिल्हा बँक, स्थानिक पतसंस्था यांचे देखील दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प पडत आहेत. कोयना विभागातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांना सोशल मीडियापासून अलिप्त रहावे लागत आहे त्यामुळे मारले गेलेले मासिक मोबाईल रिचार्ज देखील वाया जात आहेत. या सर्वांचे एकमेव कारण म्हणजे कराड, चिपळूण ठेकेदाराचे अक्षम्य अनियंत्रित काम. दररोज बेफामपणे चाललेल्या कामाकडे प्रशासनासह स्थानिक राजकारण्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराला चांगलाच वाव मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या बीएसएनएल च्या महागड्या केबल ठेकेदाराचे अकुशल यंत्रवाहक राजरोसपणे तोडत आहेत. हे सर्व होत असताना बीएसएनएल मात्र ‘पॅक’ भूमिकेत दिसत आहे.
बीएसएनएलची परस्पर विरोधी भूमिका
देशातील नामवंत टाटा समूहाने बीएसएनएलशी केलेल्या करारामुळे देशभरात बीएसएनएल ग्राहकांची संख्या वाढत आहे. २००७ नंतर बीएसएनएल पहिल्याच वेळी तीन माहीत तब्बल २६२ कोटीचा निव्वळ नफा कमविला आहे. मात्र अशा काही उदाहराणामुळे तर बीएसएनएल एवढ्या वर्ष तोट्यात होती का? असा प्रश्न पडायला लागला आहे.