बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील पाच सदस्यांचे कुटुंब काश्मीरमधील पहलगाम येथे सुट्टीसाठी गेले आहेत. दहशतवादी हल्ल्याची काहीच माहिती नसल्यामुळे ते सर्व स्थानिक पर्यटनस्थळ पाहण्यासाठी हॉटेलातून बाहेर पडण्याच्या तयारी होते. त्याचवेळी, बाहेर तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे सांगून हॉटेलमालक आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर जाण्यापासून रोखले.
निलेश जैन यांनी सांगितले की, ते आणि त्यांचे कुटुंबीय सोमवारी सोनमर्ग, गुलमर्ग आणि श्रीनगरचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण करून मंगळवारी पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. "मंगळवारी दुपारी आम्ही हॉटेलमधून बाहेर पडण्याची तयारी करत असताना, हॉटेलचा मालक आणि कर्मचारी यांनी आम्हाला थांबवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला," असं निलेश जैन यांनी सांगितलं.
निलेश जैन मुंबईत जीएसटी अधिकारी आहेत. तर त्यांचे बंधू अरुण जैन बुलढाण्यात पत्रकार आहेत. दहशतवादी हल्ल्याची घटना घडली तेव्हा निलेश यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगी आणि भावाची दोन मुले होती. हॉटेल मालकाने त्यांना बाहेर पडण्यापासून वेळीच रोखल्यामुळे, काही मिनीटांच्या फरकामुळे जैन कुटुंबीय या दहशतवादी हल्ल्यातून बचावले. आता ते सर्व सुखरुप आहेत.