काळम्मादेवीच्या दर्शनाला येतो वाघ 
महाराष्ट्र

काळम्मादेवीच्या दर्शनाला येतो वाघ; सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या यात्रेतील परंपरा कायम

सातारा-सांगली जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील कोल्हापूर जिल्ह्यातील उदगिरी गाव जैवविविधतेने समृद्ध असून येथे मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व अनेक वर्षांपासून दिसून येते. काळम्मादेवीच्या प्रसिद्ध यात्रेदरम्यान परिसरात वाघ येतो, अशी श्रद्धा असून वन्यजीव विभागाच्या नोंदींमुळे या दाव्याला वस्तुनिष्ठ आधार मिळाला आहे.

Swapnil S

कराड : सातारा-सांगली जिल्ह्यातील सरहद्दीवरील चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा वनपरिक्षेत्रातील मौजे उदगिरी, ता. शाहूवाडी हे बफर क्षेत्रातील एक महत्त्वाचे गाव आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले हे गाव जैवविविधतेने समृद्ध असून येथे मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. उदगिरीतील काळम्मादेवीच्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिराची यात्रा प्रसिद्ध असून यात्रेदरम्यान परिसरात वाघ येतो. ही केवळ आख्यायिका नसून वन्य जीव विभागाच्या नोंदींमुळे त्याला वस्तुनिष्ठ आधारही मिळाला आहे.

दरवर्षी धुलीवंदनाच्या पवित्र दिवशी काळम्मा देवीची भव्य यात्रा भरते. हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येथे येत असतात. यात्रेच्या काळात गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. ढोल-ताशांच्या गजरात, श्रद्धेच्या उत्साहात आणि पारंपरिक विधींच्या साक्षीने संपूर्ण परिसर भारलेला असतो. भक्तांना पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने वन क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने वन्यजीव विभाग विशेष दक्षता घेतो. देवीच्या यात्रेला वाघाचे आगमन ही स्थानिकांसाठी भीतीची नव्हे, तर निसर्गाशी असलेल्या त्यांच्या नात्याची जाणीव करून देणारी घटना आहे. दरम्यान, वन्यजीव विभागाच्या सतर्कतेमुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे येथे मानव आणि वन्यजीव यांच्यातील समतोल अबाधित राखला जात आहे. श्रद्धा आणि विज्ञान, परंपरा आणि संरक्षण या सर्वांचा सुंदर मेळ उदगिरीत पाहायला मिळतो, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राचे संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले.

सुरक्षेची पूर्ण खबरदारी

वन वनवा होऊ नये, अवैध वृक्षतोड अथवा अवैध शिकार यांसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी विविध ठिकाणी अधिकारी व कर्मचारी तैनात केले जातात. गस्ती पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षण यांद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते. श्रद्धा आणि सुरक्षा यांचा समतोल राखत वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली जाते.

उदगिरीला वाघ नवीन नाही

याच यात्रा काळातील काही अदभुत प्रत्यय आल्याचेही भाविकांचे म्हणणे आहे. अशातच उदगिरीतील काळम्मादेवी मंदिराचे जुने जाणते पुजारी नेहमी एक श्रद्धापूर्ण गोष्ट सांगतात,“आमच्या उदगिरी गावाला वाघ काही नवीन नाही.” त्यांच्या मते, गेली अनेक वर्षे मंदिर परिसरात वाघाचे दर्शन होत आले आहे. विशेष म्हणजे, देवीच्या यात्रेच्या काळातही वाघ मंदिर परिसरात येतो, अशी त्यांची ठाम श्रद्धा आहे.

ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दिसला ‘बाजी’

मागील दोन वर्षी म्हणजे २०२४ आणि २०२५ मध्ये झालेल्या यात्रेदरम्यान मंदिर परिसरात ‘सेनापती’ या नर वाघाचे ताजे ठसे आढळले होते. वन कर्मचाऱ्यांनी त्या ठशांची नोंद घेऊन त्याची खातरजमा केली. याशिवाय, नुकत्याच पार पडलेल्या यात्रेच्या वेळी कोयना अभयारण्य परिसरातील ‘बाजी’ या वाघाचे ट्रॅप कॅमेरामध्ये स्पष्ट चित्रण झाले आहे. हा वाघ उदगिरी परिसरात येऊन गेल्याचे पुरावे मिळाल्याने पुजाऱ्यांच्या श्रद्धेला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.

पुण्यातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीला इराण-इस्रायल युद्धाचा फटका! गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, महापालिकेचा निर्णय

राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांना ब्रेक; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर BMW कारचा भीषण अपघात; प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू