छ. संभाजीनगरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य; महापालिका कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची मुदत; वेतन रोखण्याचे आयुक्तांचे निर्देश 
महाराष्ट्र

छ. संभाजीनगरमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य; महापालिका कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची मुदत; वेतन रोखण्याचे आयुक्तांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय आणि खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : शहरातील भूजल पातळी वाढविण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय आणि खासगी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्भरण व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. जलसंचय जनभागीदारी अभियानांतर्गत गठित समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ही बैठक पार पडली.

शहरातील भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने जलसंधारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. केंद्र सरकारच्या ‘जलशक्ती अभियान - कॅच द रेन’ आणि राज्य शासनाच्या ‘जलसंचय जनभागीदारी’ अभियानांतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. बैठकीत शहरातील खासगी शाळा, रुग्णालये, व्यावसायिक संकुले, मंगल कार्यालये आणि निवासी इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापूर्वी यंत्रणा बसविलेल्या आस्थापनांनी तिची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी. तसेच संबंधित यंत्रणा उभारण्यापूर्वीची आणि उभारल्यानंतरची छायाचित्रे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावीत, असे निर्देश देण्यात आले.

महापालिकेच्या सर्व प्रशासकीय इमारती, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, उद्याने आणि खुल्या जागांवरही ही व्यवस्था करण्यात येणार आहे. खाम व सुखना नदी परिसरातील खुल्या जागांवर असलेल्या यंत्रणांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी यंत्रणा नाही, तेथे नव्याने उभारणी करण्यात येणार आहे.

पुरावे सादर करणे आवश्यक

महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुढील तीन महिन्यांत स्वतःच्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारावी. त्याचे छायाचित्र आणि आवश्यक पुरावे प्रशासनाकडे सादर करावेत. तीन महिन्यांनंतरही यंत्रणा न उभारणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच नवीन व्यावसायिक व निवासी बांधकामांना परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येणार आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणा उभारल्याचे पुरावे सादर केल्यास ही रक्कम परत केली जाईल. गुंठेवारी प्रमाणपत्रासाठीही व्यक्तिगत किंवा सामूहिक स्वरूपात रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर करणे आवश्यक राहणार आहे.

जलसंधारणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा

सलीम अली तलाव, हर्सूल तलाव आणि सावंगी तलावातील गाळ काढणे, स्वच्छता व संवर्धन करण्याचे निर्देशही देण्यात आले. पावसाच्या पाण्याचे संकलन आणि जमिनीत पुनर्भरण केल्यास भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून जलसंधारणाच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाकरेंचा निर्णय वैचारिक फारकत घेणारा; मविआ सरकार स्थापनेबाबत शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Mumbai : मालवाहतुकीत ११ टक्क्यांची वाढ; ४,८०९ कोटींचे उत्पन्न

Mumbai : कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित; FDA ची मोठी कारवाई

Mumbai : दादर रेल्वे स्थानक लवकरच 'चैत्यभूमी'; नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार - मुख्यमंत्री

Palghar: 'वाढवण'विरोधी आंदोलन तीव्र; वरोर नाक्यावर महिला, मच्छीमार, शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'