महाराष्ट्र

विरोधकांकडून 'मुख्यमंत्र्यांची कोंडी'; घटनाबाह्य मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ‘मविआ’तील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारला चोहोबाजूंनी घेरून टीकेचे लक्ष्य केले आहे.

Swapnil S

मुंबई : बदलापूरची घटना घडल्यानंतर जनआक्रोश उफाळून आला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत झालेल्या एका कार्यक्रमात आमच्या सरकारने अशाच एका घटनेत दोन महिन्यांत आरोपीला फाशी दिली होती, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची विरोधकांकडून कोंडी केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ‘मविआ’तील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती सरकारला चोहोबाजूंनी घेरून टीकेचे लक्ष्य केले आहे.

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची राज्यात पुन्हा पुनरावृत्ती टाळण्यासाठी शनिवार, २४ ऑगस्ट रोजी विरोधकांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. बदलापूरच्या घटनेत दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे नराधमांएवढेच गुन्हेगार आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे आहेत. राज्यातील विकृती प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये राज्यातील संवेदनशील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.‌ दादर सेनाभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ही शाळा भाजपशी संबंधित आहे, असे समजते. त्यामुळे चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. त्या चिमुकलीची आई गर्भवती असताना तिला १२ तास ताटकळत ठेवले. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ म्हणजे कोणाचा तरी दबाव असणार, दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे नराधमांएवढेच गुन्हेगार आहेत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला खडेबोल सुनावले.

दरम्यान, महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली असून बहिणींच्या रक्षणासाठी राज्यातील जनतेने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा केला जातोय, मात्र राज्यातील महिला असुरक्षित आहेत. बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री रत्नागिरीत राख्या बांधून घेत होते. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बदलापूर येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचे सुचले नाही. बहिणीकडून राखी बांधून घेतली, आता हाताला बांधलेल्या बंधनाला तरी जागा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

या घटनेचा निषेध करणे त्यांना योग्य वाटत नाही, म्हणजे ते विकृत व नराधमाचे पाठीराखे आहेत. एखाद्या घटनेचा निषेध हे राजकारण असे कधीपासून हे समजू लागले. विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकरची हत्या झाली, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी झटकली. फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जनतेने केली असता फडणवीस म्हणाले, ‘कुत्रा गाडी खाली येऊन मेला तरी राजीनामा मागाल.’ आता चिमुकलीवर अत्याचार झाले, मग या चिमुरडीची तुलना कोणाशी करणार, असा उलट सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना विचारला.

क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झाला, ते जनतेच्या भावनांशी फक्त खेळताहेत. आधीच गद्दार आणि जनतेच्या भावनेशी गद्दारी करताय हे दुःख होतंय. सुषमा अंधारे जाऊन ठिय्या मारून बसल्यानंतर त्या नालायक वामन म्हात्रेवर गुन्हा दाखल झाला, नाहीतर तो सुटलाच होता, अशा शब्दांत त्यांनी महायुती सरकारला सुनावले.

गुलाबी जॅकेट पण होते

बदलापूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री तेथे जाणे अपेक्षित होते. पण ते रत्नागिरीत अर्धा डझन मंत्र्यांसह तिकडे होते आणि त्यावेळी गुलाबी जॅकेट पण होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.

पोलीस आयुक्त कुठे?

बदलापूरच्या घटनेनंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त अद्याप समोर आलेले नाहीत. त्यांनी समोर येऊन खुलासा करणे अपेक्षित होते. मात्र तेच समोर आले नाहीत म्हणजे कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करतायंत हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.

कुटुंबीयांची लवकरच भेट घेणार!

मी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यास जाणार आहे. आता कुटुंबीयांना त्रास द्यायचा नाही, त्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे. त्यांच्याबरोबर बोलणं झालं आहे, लवकरच भेट घेण्यास जाणार आहे, असेही ते म्हणाले.

दोन महिन्यांपूर्वी फाशी दिली त्याच्या चौकशीसाठी एसआयटी लावा

पुण्यातील मावळमध्ये घडलेल्या घटनेतील आरोपी तेजस दळवी याला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि दोन महिन्यांत फाशी दिली, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दोन महिन्यांत फाशी दिली, याची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीच ‘फेक नरेटिव्ह’ पसरवत आहेत - वडेट्टीवार

मुख्यमंत्री भरसभेत ‘फेक नरेटिव्ह’ पसरवत आहेत, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकार आल्यापासून बलात्कारी तर सोडा, इतर कोणत्या प्रकरणातील आरोपीला दोन महिन्यांत फाशी झाली? त्या आरोपींची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. मुख्यमंत्री खुलेआम भरसभेत जनतेशी खोटे बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले, मात्र पोलिसांची रिमांड कॉपी बघा, अटक केलेल्या सर्व आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहेत.”

मुख्यमंत्र्यांना बदलापुरात जावेसे वाटले नाही - संजय राऊत

बदलापूर प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालणार, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ज्यांचे स्वतःचे सरकार ट्रॅकवर नाही ते फास्ट ट्रॅकच्या गोष्टी करतात हे आश्चर्यच आहे. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात, त्यांचा मुलगा त्या मतदारसंघाचा खासदार आहे, पण दोघांनाही बदलापुरात जावेसे वाटले नाही. राज्यात ‘लाडकी बहीण’ योजना आणि त्याचा जोरात प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महिलांची अब्रू लुटली जात आहे. नरेंद्र मोदी या विषयामध्ये बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन