महाराष्ट्र

हवामान बदलाचा रानमेव्याला फटका ; जांभूळ, करवंदांची आवक अत्यल्प प्रमाणात

यंदा मात्र खराब हवामानामुळे उत्‍पादनावर परिणाम झाल्‍याने ग्राहकांना रानमेवा मोठ्या प्रमाणात होऊ शकलेला नाही

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या शहरात तीव्र उष्णता जाणवत आहे. मात्र वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाचा फटका यंदा उन्हाळ्यात सहज आणि जास्त प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या रानमेव्यावर झाल्याचे निदर्शनास आले आहे. यंदा जांभूळ, कैरी, करवंद, काजू हा रानमेवा बाजारात दिसत असला तरी त्याची आवक अल्प प्रमाणात येत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये जांभळावर सर्वाधिक परिणाम झाल्याचे देखील विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पनवेल, रायगड, वसई, पालघर याठिकाणी असणाऱ्या आदिवासी वाड्या आणि तेथील आजूबाजूच्या बाजारात मे महिन्यापासून रानमेवा विक्रीसाठी येतो. येथील आदिवासी बांधव उन्हाळ्यात जांभूळ, करवंद, कैरी, गावठी आंबे, काजू विकून उपजीविका करतात. यंदा मात्र खराब हवामानामुळे उत्‍पादनावर परिणाम झाल्‍याने ग्राहकांना रानमेवा मोठ्या प्रमाणात होऊ शकलेला नाही. परिणामी आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहावर देखील त्याचा परिणाम झाला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून उन्हाळ्यात हमखास येणारा रानमेवा म्हणून या दिवसांत हक्काने खाल्ली जाणारी जांभळे ठिकठिकाणी दिसू लागली आहेत. एरवी पनवेलसह पालघर, वसईच्या बाजारात, रस्त्यांच्या कडेला बांबूच्या टोपली, त्यामध्ये पाने आणि त्यावर रसाळ जांभळे घेऊन विक्रेते मोठ्या संख्येने दिसतात. मात्र सध्या वातावरण बदलाचा फटका रानमेव्याला बसला आहे. परिणामी जांभूळ, करवंद फळांची आवक कमी होत असून सध्या आवक कमी असल्‍याने २०० रुपये किलो दराने जांभूळ विक्री केली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली