प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चुरस वाढणार; मुदतवाढीनंतर विद्यार्थ्यांचे अर्ज वाढले

कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने मुदतवाढ दिली आहे.

Sagar Sirsat

मुंबई : कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने मुदतवाढ दिली आहे. यामुळे अर्ज नोंदणीमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त तर शुल्क भरून अर्ज निश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चार हजारांपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस लागणार आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ शाखांसाठी २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६८६ जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार २४० जागा उपलब्ध आहेत. या जागांवर प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करण्यास सीईटी कक्षाने १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती. १५ जुलैपर्यंत १८ हजार ७०६ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. त्यापैकी १४ हजार २०७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपला अर्ज निश्चित केला होता.

मात्र राज्यातील विविध भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने अर्ज भरण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. तसेच सेतू कार्यालयातून आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सीईटी कक्षाने अर्ज नोंदणी करण्यास २२ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

मुदतवाढीनंतर दोन दिवसांतच ३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली. तर ४ हजार ४१८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. यामुळे अर्ज नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता २२ हजार ३४३ तर शुल्क भरून अर्ज निश्चिती करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १८ हजार ७२५ इतकी झाली आहे. अर्ज भरण्यास अद्याप पाच दिवस शिल्लक असल्याने अर्जांची संख्या आणखी वाढणार असल्याचे, सीईटी सेलच्या कृषी विभागाचे परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी सांगितले.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप