सुजीत ताजणे/ छत्रपती संभाजीनगर
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून दरवर्षी पीक स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून रब्बी हंगामासाठी आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्रिस्तरीय स्पर्धेतील सर्वांत मोठे पारितोषिक ५० हजार रुपये रोख शेतकऱ्यांना शासनाकडून दिले जाणार आहे.
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पीक स्पर्धा असते. शिवाय जे शेतकरी चांगले उत्पादन घेतात, त्यांना एका समारंभात बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. यामुळे त्यांची प्रसिद्धीही होते.
रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे विहीत नमुन्यातील अर्ज करणे गरजेचे आहे. अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३०० रुपये तर मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी १५० रुपयांचे शुल्क, सातबारा आणि आठ 'अ'चा उतारा तसेच जात प्रमाणपत्रही (आदिवासींसाठी) सादर करावे लागते.
रब्बीच्या चार पिकांसाठी स्पर्धा
बळीराज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई व जवस या पिकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खालील बक्षिसे मिळणार?
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पहिले बक्षीस ५ हजार, दुसरे ३ हजार तर तिसरे बक्षीस २ हजार रुपये आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता प्रथम बक्षीस १० हजार रुपये तर द्वितीय बक्षीस ७ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय ३० हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावा.
- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक