संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Elections 2024 : महायुती, मविआच्या जागावाटपाचा गोंधळ सुरूच

राज्यातील प्रमुख सहा पक्षांमध्येही याद्या व उमेदवारी देण्यावरून घोळ सुरूच आहे. ‘आयाराम’, ‘गयाराम’चे सत्रही अखेरपर्यंत सुरूच असल्याने कुणाचा पायपोस कुणात हेच जनतेला कळेनासे झाले आहे.

Swapnil S

मुंबई : महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असतानाही सुरूच होता. महायुती व मविआने अनेकवेळा जागावाटपाचे वेगवेगळे फॉर्म्युले जाहीर केले. पण, नक्की कुणाच्या वाट्याला किती जागा आल्या हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तसेच राज्यातील प्रमुख सहा पक्षांमध्येही याद्या व उमेदवारी देण्यावरून घोळ सुरूच आहे. ‘आयाराम’, ‘गयाराम’चे सत्रही अखेरपर्यंत सुरूच असल्याने कुणाचा पायपोस कुणात हेच जनतेला कळेनासे झाले आहे.

१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी तुरुंगवास भोगलेले तसेच सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उठवणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काटोलमधून पुन्हा एकदा निवडणूक लढतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आपल्या मुलाला या मतदारसंघातून लढण्यासाठी पुढे केले आहे.

गोपाळ शेट्टी, प्रकाश मेहता, सुनील राणे यांचा पत्ता कट

घाटकोपर पूर्व हा भाजपचा गड असून याठिकाणी प्रकाश मेहता, प्रवीण छेडा उमेदवारीसाठी उत्सुक होते. भाजपने दोघांचा पत्ता कट करत भाजपचे विद्यमान आमदार पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर बोरिवली हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकसभेला गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांना विधानसभेला संधी मिळेल, असे वाटले होते. मात्र भाजपने धक्कातंत्र देत गोपाळ शेट्टी यांना संधी तर दिलीच नाही, उलट विद्यमान आमदार सुनील राणे यांचाही पत्ता कट करत संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आपण भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या आदेशानुसार काम करणार, असे भाजपचे नेते प्रकाश मेहता यांनी स्पष्ट केले.

अनिल देशमुख यांची माघार, मुलाला संधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास फक्त एक दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ७ उमेदवारांची चौथी यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने त्यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना शरद पवारांनी काटोलमधून संधी दिली आहे.

राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात

दौंड विधानसभा मतदारसंघात रमेश थोरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे राहुल कुल विरुद्ध थोरात असा सामना रंगणार आहे. वाई-सातारा विधानसभा मतदारसंघात अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तसेच माण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कोणाला संधी देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माणमध्ये अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे प्रभाकर देशमुख यांनी माघार घेतली. त्यानंतर अभय सिंह जगताप, अनिल देसाई आणि प्रभाकर घार्गे यांची नावे चर्चेत होती. अखेर शरद पवार यांनी प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर केली.

वाईमध्ये शरद पवारांकडून मोठा धक्का देण्यात आला. नितीन सावंत आणि अरुणा देवी पिसाळ यांच्या नावाची चर्चा असताना अरुणा देवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. अरुणा देवी पिसाळ या सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आहेत. तसेच, वाई विधानसभेचे प्रतिनिधित्व याआधी मदनराव पिसाळ यांनी केले आहे. आता २०२४ विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पिसाळ कुटुंबीयांना विधानसभा लढण्याची संधी देण्यात आली.

...तर नवीन केसेस टाकल्या असत्या - अनिल देशमुख

“यंदा निवडणुकीसाठी पुन्हा उभा राहिलो असतो, तर पुन्हा नवीन केसेस लावल्या असत्या. त्यामुळे मी उभा न राहता, सलीलला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्याने मला आग्रह करत उभे राहण्यास म्हटले होते, पण मी त्याला समजावून सांगितले आणि तो तयार झाला. मी जरी उभा नसलो, तरी भविष्यात सरकार महाविकास आघाडीचे येणार आहे. त्यानंतर शरद पवार मला पहिल्यांदा विधान परिषदेचा आमदार बनवतील,” असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.

पहिल्या यादीमध्ये भाजपकडून सर्वाधिक ९९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. आता भाजपकडून आपली तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात २५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत भाजपने तीन याद्यांमधून महायुतीमध्ये सर्वाधिक १४६ उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीत माळशिरस मतदारसंघातून पुन्हा एकदा राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राम सातपुते यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला होता. फडणवीस यांचे विश्वासू असलेल्या सातपुते यांना या पराभवानंतरही भाजपकडून माळशिरसमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर आष्टीमधून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आर्वीतून सुमित वानखेडे, वर्सोव्यातून भारती लव्हेकर, कारंजातून सई डहाळे, सावनेरमधून आशिष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सुनील राणेंचा पत्ता कट!

मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या बोरिवली विधानसभेत मोठी खेळी भाजपने खेळली आहे. या मतदारसंघात माजी खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढण्यास इच्छुक होते, तर विद्यमान आमदार सुनील राणे यांनाही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे होते. मात्र, पक्षाने या दोघांनाही उमेदवारी न देता पक्षाचे नेते संजय उपाध्याय यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे भाजपचा गड असलेल्या बोरिवलीत बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे.

वारंवार छळ करणे योग्य नाही - गोपाळ शेट्टी

“मी सकाळपासून पक्षाच्या बैठकीत आहे. मी भाजपच्या विचारांना सोडले नाही, सोडणारही नाही. अन्य पक्षात जाऊन काम करणार नाही. बोरिवली ही धर्मशाळा नाही. वारंवार छळ करणे योग्य नाही. भारतीय संविधानात एक नगरसेवक, एक विधानसभा आणि एक लोकसभेचा मतदारसंघ असतो. कायद्यात कुणीही कुठून लढू शकत नाही, असे लिहिलेले नाही. परंतु स्थानिक लोकांसाठी स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते. पहिल्यांदा विनोद तावडेंना आणले. त्यानंतर सुनील राणेंना आणले, मी खासदार होतो, लोकांनी चालवून घेतले. मला बदलून पियूष गोयल यांना आणले. तरीही मी गोयल यांच्या पाठीशी होतो. मात्र आता पुन्हा तसेच झाले. संजय उपाध्याय हे चांगले कार्यकर्ते असून त्यांनी पक्षासाठी काम केले आहे, यात शंका नाही. परंतु बोरिवली मतदारसंघात वारंवार अशाप्रकारे खेळ करणे बरोबर नाही. बोरिवलीकर काय म्हणतायेत, हे पाहून मी निर्णय घेईन, असे सांगून गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.

भाजपची तिसरी यादी

हरीश पिंपळे (मूर्तिजापूर)

सई डहाके (कारंजा)

राजेश वानखडे (तिवसा)

उमेश यावलकर (मोर्शी)

सुमित वानखेडे (आर्वी)

चरणसिंग ठाकूर (काटोल)

आशिष देशमुख (सावनेर)

प्रवीण दटके (नागपूर मध्य)

सुधाकर कोहले (नागपूर पश्चिम)

मिलिंद माने (नागपूर उत्तर)

अविनाश ब्राह्मणकर (साकोली)

किशोर जोरगेवार (चंद्रपूर)

राजू तोडसाम (आर्णी)

किशन वानखेडे (उमरखेड)

जितेश अंतापूरकर (देगळूर)

विनोद मेढा (डहाणू)

स्नेहा दुबे (वसई)

संजय उपाध्याय (बोरिवली)

भारती लव्हेकर (वर्सोवा)

पराग शाह (घाटकोपर पूर्व)

सुरेश धस (आष्टी)

अर्चना पाटील-चाकूरकर (लातूर शहर)

राम सातपुते (माळशिरस)

मनोज घोरपडे (कराड उत्तर)

संग्राम देशमुख (पलूस कडेगाव)

पवारांचे ७ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात

सलील देशमुख (काटोल)

प्रभाकर घार्गे (माण)

वैभव पाटील (खानापूर)

अरुणा देवी पिसाळ (वाई)

रमेश थोरात (दौंड)

शरद मेंद (पुसद)

संदीप बेडसे (सिंदखेडा)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी