मुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या दानाची चोरी झाल्याचे उघड झाल्याने काँग्रेसने या चोरीचा जाब विचारण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात आंदोलनाचा शंखनाद केला जाणार आहे. त्यानंतर ९ जुलैपासून राज्यभर 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह करण्यात येईल. प्रभूरामाच्या मंदिराला रामभक्तांनी लाखो रुपये दान स्वरूपात दिले. सोन्या-चांदीचे दागिने दिले. पण भक्तांनी दिलेल्या दान आणि देणग्यांवर भाजप तसेच रा. स्व. संघाच्या लबाड बगलबच्चांनी दरोडा टाकला.
हा केवळ पैसे अथवा देणग्यांवर टाकलेला दरोडा नसून श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरच टाकलेला दरोडा आहे. रामाला लुटणाऱ्या - भाजप आणि संघाच्या दरोडेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे, या - मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत असल्याचे काँग्रेस - प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले.
नाशिकच्या आंदोलनंतर ९ जुलै ते १४ जुलै दरम्यान राज्यभर सर्व जिल्ह्यात 'रघुपती राघव राजाराम' सत्याग्रह केला जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राम मंदिर, शिव मंदिर अथवा हनुमान मंदिरात हा सत्याग्रह केला जाणार आहे. "मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या भाजप, आरएसएसच्या लबाड लोकांना सुबुद्धी दे", अशी प्रार्थनाही यावेळी केली जाणार असल्याचे सपकाळ म्हणाले.