महाराष्ट्र

विशाळगड प्रकरणात दंगली घडवण्याचे षडयंत्र; नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Swapnil S

मुंबई : विशाळगडावर झालेल्या दंगलीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आक्रमक झाले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याच्या नावाखाली दंगली भडकविण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. निवडणुका जवळ येत चालल्याने राजकीय लाभ उठविण्यासाठीचा हा खटाटोप आहे, असेही ते म्हणाले. तर दंगलींमागे ज्यांचा हात आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आपल्या नावावरून दंगली झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनाही ते रुचणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली धार्मिक तेढ निर्माण करत राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दंगेखोरांच्या मुसक्या आवळत कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.‌

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती, धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणून त्यांना लोकराजे म्हणतात. पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. या दंगेखोरांच्या तत्काळ मुसक्या आवळा व कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू, मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे, असेही ते म्हणाले.

विशाळ गडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड, किल्ल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे. न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळ गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली १४ तारखेला विशाळगडापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत, असे पटोले म्हणाले.

महाराजांनाही घडला प्रकार आवडला नसता - जयंत पाटील

विशाळगड अतिक्रमणप्रकरणी तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत अजामीनपात्र कलम लावावे आणि हल्ल्यात विस्थापित झालेल्यांचे राज्य सरकारने तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. शिवप्रेमाच्या नावाखाली हिंसाचार व दंगल करण्याची ही कृती खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनादेखील आवडली नसती, असे मतही जयंत पाटील यांनी ‘एक्स’वर व्यक्त केले आहे.

विशाळगडप्रकरणी अफवा पसरवू नका - अमोल येडगे

जिल्ह्यातील किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणाबाबत शासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत, मात्र काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफित भ्रमणध्वनीच्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करुन सामाजिक अस्थिरता, तसेच कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणीत आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळावेत, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या अनुषंगाने समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश किंवा बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग प्रदर्शित करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त