छत्रपती संभाजीनगर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १६४ एकर जागा असून, यापुर्वी बाजार समितीने कृषी पणन मंडळास ५० एकर जागा कर्जाच्या मोबदल्यात दिलेली आहे.
५ एकर वखार महामंडळ, १ एकर कापुस उत्पादक पणन महासंघ, १ एकर एमएसईबी, खरेदी विक्री संघ ०.२० गुंठे, महानगर पालिकेस १० एकर असे एकुण जवळपास ६८ एकर जमीन लिजभाडयाने दिलेली असून उर्वरीत ९६ एकर मध्ये बाजार समितीने धान्य मार्केट मध्ये १ ते ५, फळेभाजीपाला मार्केट, जनरल शॉपींग सेंटर, १२ गोदाम, १५ गोदाम, ४२ शॉप कम गोदाम, कमर्शियल शॉपींग सेंटर, कांदा मार्केट, प्रिकोटेड शेड, सुलभ शौचालय, शेतकरी निवास, शेतकरी भावन, कार्यालय इमारत, बँक इमारत, भुईकाटा, किराणा मार्केटसाठी पहिल्या, दुसऱ्यां व तिसऱ्या टप्यात प्लॉट दिलेले असुन त्यावर व्यापा-यांना बांधकाम सुरु केलेले आहे तसेच अंतर्गत सिमेंट काँक्रीट रोड, स्ट्रीट लाईन, ड्रेनेज लाईन इत्यादी वेळोवेळी सन १९९८ पासून शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध केलेल्या असून नविन मोंढा कार्यान्वीत केलेला आहे.
आधुनिक शेतकरी मॉल उभारणीचा प्रस्ताव बाजार समितीस दिला होता. बाजार समितीने संबंधीताचा प्रस्ताव दि. २ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक सभेतील ठराव क्र. ४ नुसार एकुण १८ संचालकांपैकी २ संचालक अनुपस्थित होते. उर्वरीत १६ संचालकांपैकी जगन्नाथ वैजीनाथराव काळे, मुरलीधर पुंडलिकराव चौधरी व अब्दुल रहीम पठाण या ३ संचालकांचा विरोध नोंदवून बहुमताने आधुनिक शेतकरी मॉल उभारणीचा प्रस्ताव पारीत केलेला आहे. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बाजार समितीच्या मिटींगमध्ये उपस्थित १८ संचालकांपैकी ४ संचालकांचा विरोध नोंदवून बहुमताने ठराव कायम करण्यात आलेला आहे. प्रस्तावामध्ये बाजार समितीने कुठल्याही प्रकारचा निधी न गुंतवता बाजार समितीस २७ टक्के हिस्सा म्हणजेच साधारण २१५ करोड रुपये मिळणार आहेत तसेच शेतकरी मॉल उभारणीसाठी सर्व शासकीय निमशासकीय मंजूऱ्या व त्यास लागणारा खर्च हा नक्षत्र इन्फोटेक प्रा.लि. यांनी करावयाचा आहे.
बाजार समिती फक्त अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करणार आहे. आधुनिक शेतकरी मॉलमध्ये शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी, माती परिक्षण कार्यशाळा, होलसेल फर्टिलायझरचे शोरुम, ठिबक चिंचनचे पाईप, शेतीशी अनुषंगिक सर्व अवजारांचे शोरुम, ट्रॅक्टर शोरूम, शेतीशी संबंधीत सर्व शोरुम व ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी ग्राहक उपयोगो सर्व गोष्टींचे शोरुमचा समावेश असणार आहे, असा आधुनिक शेतकरी मॉल मराठवाड्यात प्रथमच उभारणी केलेला असेल, शेतकरी मॉल उभारणी केल्यामुळे बाजार समिती मधील इतर फळेभाजीपाला मार्केट, धान्य मार्केट, जनरल शॉपींग सेंटर मार्केट येथील होलसेल व्यवहारामध्ये देखील मोठया प्रमाणात शेतमालाची आवक वाढून बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे असे सभापती डॉ. राधाकिसन देवराव पठाडे यांनी सांगितले.