महाराष्ट्र

‘सरकारला गुंडांचा विळखा, सरकार कुणासाठी हे ओळखा?’, रोहित पवारांचा घणाघात

राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यावरून 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार'चे नेते रोहित पवार यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Swapnil S

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या पोलीस ठाण्यातच शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे प्रकरण अद्याप शमलेले नाही. अशातच बुधवारी जळगावच्या चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबार झाला. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होणाऱ्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यावरून 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार'चे नेते रोहित पवार यांनी राज्य सरकारसह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आली आहे, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केली. गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पहावं लागणार आहे? असा सवालही त्यांनी फडणवीसांना टॅग करून विचारला आहे.

"गुंडच सरकारसोबत फोटोसेशन करतात, मंत्रालयात रिल्स बनवतात, भाजपाचे आमदार पोलिस ठाण्यात गोळ्या घालतात आणि आता भाजपाच्या नगरसेवकावर गोळ्या झाडल्या…हे सगळं पाहिल्यावर ‘सरकारला गुंडांचा विळखा आणि सरकार कुणासाठी हे ओळखा?’ असं म्हणायची वेळ आलीय..गृहमंत्री महोदय राज्यातील जनतेला आपल्या मागदर्शनाखाली अजून काय काय पहावं लागणार आहे?", अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

दरम्यान, बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे हे कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर तीन अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. मोरे यांच्यावर गोळीबार का केला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी