महाराष्ट्र

राज्यातील जनता भीतीच्या छायेत अन् गृहमंत्री फक्त....अमोल कोल्हेंची फडणवीसांवर टीका

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय परिस्थिती असून राज्यभरात गुन्हेगारांचे राज्य असून गृहमंत्री केवळ सभा-समारंभात, प्रचारात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात घुसून टोळक्याने उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाला आणि महिला डॉक्टरलाही जबर मारहाण केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय परिस्थिती असून राज्यभरात गुन्हेगारांचे राज्य आहे. पण, गृहमंत्री केवळ सभा-समारंभात, प्रचारात व्यस्त आहेत', अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

"छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना झालेली अमानुष मारहाण निंदनीय आहे. सेवाभावी वृत्तीने रुग्णांची सुश्रुषा करणारे डॉक्टर्सही सुरक्षित नाहीत ही बाब राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची दयनीय परिस्थिती सांगण्यास पुरेशी आहे. राज्यभरात गुन्हेगारांचे राज्य असून कुठे कोयता गँगची दहशत आहे तर कुठे दिवसाढवळ्या गोळीबार होताय. राज्यातील जनता सातत्याने भीतीच्या छायेत असताना राज्याचे गृहमंत्री केवळ सभा-समारंभात, प्रचारात व्यस्त आहेत ही बाब निंदनीय आहे", असे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात घुसून टोळक्याने उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रुग्ण जखमी झालाच, पण डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने महिला डॉक्टरलाही गंभीर दुखापत झाली आहे. हा तुफान राडा सुरू असताना सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी न केल्यामुळे चार जवानांना निलंबित करण्यात आले आहे. तथापि, या मारहाणीचे कारण अजून पुढे आलेले नाही. दोन्ही गटांकडून फ्री स्टाईल मारामारी सुरु होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामध्ये एक गट रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये घुसून एका रुग्णावर हिंसक हल्ला करताना दिसतात. या गोंधळात शेजारी उभ्या असलेल्या एका महिला डॉक्टरला रॉडचा फटका बसून मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव