नाना पटोले यांचे संग्रहित छायाचित्र एक्स
महाराष्ट्र

मला पदमुक्त करा! नाना पटोलेंचे खर्गेंना पत्र; विधानसभा निवडणुकीतील पराभवाची स्वीकारली जबाबदारी

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे.

Swapnil S

मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

प्रदेश कमिटी बरखास्त करा!

मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे मला आता सर्व जबाबदारीतून मुक्त करावे, प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करावा, अशी विनंतीही पटोले यांनी आपल्या पत्रात केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन आपल्या राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना तूर्त पदावर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी पत्राद्वारे पदमुक्त करण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पराभवाची जबाबदारी पटोलेंचीच - वडेट्टीवार

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेतले होते. त्यामुळे साहजिकच विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येईल, असे वक्तव्य माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसच्या गोटात रंगली आहे. नव्या प्रदेशाध्यक्षांची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपुरात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

पटोलेंवर अनेक नेते नाराज

नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज असून, त्यांना हटवण्याची मागणी सुरू आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील जागावाटपात काही महत्त्वाच्या जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. या घटनेनंतर जागावाटपाच्या बैठकांची जबाबदारी नाना पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती