devendra fadnavis FPJ
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी गाठली दिल्ली, अमित शहांची घेणार भेट

Swapnil S

विशेष प्रतिनिधी

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे आता जोरदार पडसाद महायुती आणि भाजपात उमटत आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळे करण्याची पक्षाला विनंती करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नागपूरमार्गे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत ते पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत. राज्यातील पराभवाची कारणमीमांसा आणि राजीनाम्याची तयारी या मुद्दयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच अन्य छोटे मोठे पक्ष सोबत घेऊन महायुतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. लोकसभा निकालात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिला. महायुतीला १७ तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. एका जागेवर काँग्रेसचा बंडखोर उमेदवार निवडून आला. भाजप २३ जागांवरून ९ जागांवर आला.  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना  लोकसभा निवडणुकीचे निकाल महायुती विशेषतः भाजपसाठी धक्कादायक आहेत.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटनेत काम करता यावे म्हणून पक्षाने आपल्याला सरकारमधून मोकळे करावे, अशी विनंती त्यांनी पक्षाला केली आहे. यानंतर भाजपामध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.  देवेंद्र फडणवीस यांनी  नागपूरमार्गे दिल्ली गाठली. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिका-यांनी फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवास्थानी फडणवीसांसोबत सुमारे दोन तास चर्चा केली.  त्यानंतर फडणवीस दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत ते पक्षाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, फडणवीसांच्या पद सोडण्याच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सक्रिय झाला आहे. तसेच दिल्लीत फडणवीसांना बोलावणे आल्याने येत्या काही दिवसांत राज्यात महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार हे निश्चित मानले जात आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त