मुंबई : महाराष्ट्रात संभाव्य इंधन संकट ओढवणार असल्याच्या बातम्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून भीतीपोटी जादा खरेदी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केले.
काही भागांतील पेट्रोल पंपांवर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे जनतेमध्ये निर्माण झालेली चिंता दूर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, इंधनाची पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. केवळ ग्राहकांकडून गरजेपेक्षा जास्त इंधनाचा अनावश्यक साठा केला जात असल्यामुळेच यंत्रणेवर तात्पुरता ताण येत आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे. भीतीपोटी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यास पुरवठा व्यवस्थेवर अतिरिक्त दबाव येतो आणि त्यातून कृत्रिम टंचाई निर्माण होते'.
तसेच, केंद्र सरकारकडे पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून पुरवठाही सुरळीत सुरू आहे. अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाल्यावर लोक मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरू लागतात आणि पुरवठा साखळी विस्कळीत होते. त्यामुळे नागरिकांनी संयम राखण्याचे आणि आवश्यक तेवढ्याच प्रमाणात इंधन वापरण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
नागपूरमध्ये डिझेलच्या तुटवड्यामुळे पोलिसांच्या गाड्यांचे कामकाज प्रभावित झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी हा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांसाठी किंवा सर्वसामान्य जनतेसाठी इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, इंधनाच्या उपलब्धतेबाबत दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती पसरवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
बँकिंग व्यवस्थेशी केली तुलना
पुरवठा साखळीचे गणित समजावून सांगताना त्यांनी बँकिंग व्यवस्थेचे उदाहरण दिले. 'जर सर्वच लोकांनी एकाच वेळी बँकेतून पैसे काढण्यासाठी गर्दी केली, तर बँकेत तात्पुरती रोख रकमेची (लिक्विडिटी) समस्या निर्माण होऊ शकते. हाच नियम इंधन वितरणालाही लागू होतो. पुरवठा साखळी ही दैनंदिन नियमित मागणी पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली असते. लोकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्यासाठी एकत्र गर्दी केल्यास यंत्रणेवर ताण पडणे स्वाभाविक आहे', असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
देशात तुटवडा नाहीः पेट्रोलियम मंत्रालय
केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे. मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोलियम उत्पादने, स्वयंपाकाचा गॅस किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा नाही. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे सज्ज आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर टीका अयोग्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी यापूर्वीही म्हटले होते आणि पुन्हा सांगतो, हा 'रिजेक्टेड माल' आहे, असे फडणवीस म्हणाले. यापूर्वी अशा भाषेवरून शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांमुळे भारताने विविध देशांबरोबर केलेले धोरणात्मक करार पुढील अनेक वर्षांसाठी देशाचे भवितव्य सुरक्षित करणारे आहेत, असे सांगत फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याचे समर्थन केल्याकडे लक्ष वेधले.
वि. प. निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न
विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आम्ही महायुतीमधील तीन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. या निवडणुकीसाठी आमची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुरू आहे. विधान परिषदेच्या सर्व जागा एकत्र लढवाव्यात असा आमचा प्रयत्न असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. विधान परिषदेच्या १७ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निडणुकीसाठी येत्या १८ जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाबाबत आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडीत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक या जागांवरून महायुतीत रस्सीखेच आहे. यासंदर्भात फडणवीस यांना विचारले असता त्यांनी निवडणूक एकत्र लढण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
राज्यात महिनाभराचा साठा : छगन भुजबळ
दुसरीकडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या विषयावर माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रात सध्या साधारण एक महिना पुरेल एवढा इंधनाचा राखीव साठा उपलब्ध आहे. काही पेट्रोल पंपांवर साठा पुन्हा भरण्यास काहीसा उशीर होत असल्याचे समोर आले असले, तरी पेट्रोल किंवा डिझेल अजिबात उपलब्ध नसल्याची कोणतीही अधिकृत तक्रार अद्याप आलेली नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मध्यपूर्वेतील स्थिती सुधारली नाही तर राज्याला मोठ्या इंधन टंचाईचा सामना करावा लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्थिती स्पष्ट करावी- सुप्रिया सुळे
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांच्या विधानावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासाही मागितला आहे. त्या म्हणाल्या, राज्यभरात पेट्रोल-डिझेलच्या टंचाईमुळे पंपावर रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचे देखील वृत्त आहे. राज्यात सर्वत्र इंधनटंचाईमुळे जनता त्रस्त असताना शासनाने केवळ एक महिना पुरेल एवढेच इंधन असल्याचे स्पष्ट केले आहे. जनतेमध्ये संभ्रमाचे आणि चिंतेचे वातावरण आहे, नेमकं काय सुरु आहे याबाबत स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी पुढे येऊन खुलासा केला पाहिजे.
मोदींनी जनतेला दिली महागाई, टंचाईची मिरची : वडेट्टीवार
दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील इंधन टंचाईवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मोदीजी, इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट आणि भारतीयांना गाजर, हे काय पटलं नाही आम्हाला ! देशातील जनतेला महागाईची, टंचाईची मिरची देऊन मोदीजी इटलीच्या पंतप्रधानांना चॉकलेट देत आहेत. एक चॉकलेट त्या २२ लाख विद्यार्थ्यांना द्या, ज्यांचे स्वप्न 'नीट' पेपरफुटीने धुळीस मिळवले आहे.