महाराष्ट्र

अखेर मुंडेंची विकेट! स्वीय सहाय्यकामार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा सुपूर्द; महायुतीला पहिला धक्का

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन तसेच या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडशी असलेले मंत्री धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे संबंध आणि पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेले आरोपपत्र यामुळे अखेर धनंजय मुंडेंची विकेट पडली.

Swapnil S

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन तसेच या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडशी असलेले मंत्री धनंजय मुंडेंचे अतिशय जवळचे संबंध आणि पोलिसांनी याप्रकरणी दाखल केलेले आरोपपत्र यामुळे अखेर धनंजय मुंडेंची विकेट पडली.

विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलेली असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीला पहिला धक्का बसला असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची चौफेर झोड उठवली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येसह खंडणी वसुली आदी प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी गेल्या तीन महिन्यांपासून भाजप आमदार, काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आदींनी लावून धरली होती. अखेर तीन महिन्यांनंतर मुंडेंना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंडे यांनी मंगळवारी आपले स्वीय सहाय्यक आणि ओएसडींच्या मार्फत राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नंतर मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आता मंत्रिपद गेल्यानंतर मुंडे यांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले, मात्र मुंडे यांनी स्वत: याप्रकरणी ट्विट करत आजारपणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विरोधकांनी त्यावरूनही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. खंडणीसाठी ही हत्या झाली, असा आरोप होऊ लागल्यानंतर संपूर्ण राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. खंडणीच्या वादातून देशमुख यांची हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिकी कराड याचे नाव चर्चेत आले. देशमुख यांच्या हत्येनंतर नवनवीन गोष्टी उघडकीस येत गेल्या.

देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेस येताच एकच खळबळ उडाली. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. भाजप आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी नवनवीन गोष्टी उजेडात आणत महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची कोंडी केली. शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे सेना याप्रकरणी आक्रमक झाले. अखेर धनंजय मुंडे यांच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली. वाल्मिक कराडसह अन्य संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई कधी होणार, अशी चर्चा गेल्या तीन महिन्यांपासून रंगली होती.

धनंजय मुंडे यांनी पीएमार्फत राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवल्याची चर्चा होती. अखेर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असे जाहीर केले. तसेच पुढील कार्यवाहीसाठी तो राज्यपालांना पाठवण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यपालांनीही त्यावर तत्काळ कार्यवाही करत हा राजीनामा स्वीकारला. त्यामुळे महायुतीतील पहिल्या मंत्र्यांची विकेट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

दरम्यान, संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर ठिकठिकाणी संताप व्यक्त करण्यात येत आहे. लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला असून संतप्त तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. बीडमध्ये अपर जिल्हादंडाधिकारी यांनी ३ ते १७ मार्चदरम्यान मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात नागरिकांनी मंगळवारी ‘बीड जिल्हा बंद’ची हाक दिली. दुसरीकडे केजमध्ये नागरिक आक्रमक झाले. धारूर चौकात टायर जाळून निषेध नोंदवण्यात आला.

फडणवीस, अजितदादांनीही राजीनामा द्यावा - सपकाळ

संतोष देशमुख यांच्या हत्येची छायाचित्रे आणि व्हिडीओ पोलिसांसह सरकारकडे असताना त्यांनी धनंजय मुंडेंच्या बचावाची भूमिका घेतली. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे त्यांनीही तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार - दमानिया

धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. हीच माझी संतोष देशमुखांना आदरांजली असणार आहे. धनंजय मुंडे वैद्यकीय कारणाने राजीनामा दिल्याचे म्हणतात, पण त्यांना मन तरी आहे का? मुंडे यांनी लोकांना छळले, त्यामुळे त्यांच्या पापाचा घडा भरला आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितले.

राजीनाम्यासाठी ८४ दिवस का लागले - सुप्रिया सुळे

नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे भुजबळ, अजित पवार म्हणतात. पण धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा न सुद्धा नाही. त्यांनी स्वत:च्या तब्येतीमुळे राजीनामा दिला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे हा राजीनामा नैतिकतेवर दिला आहे की, स्वतःच्या तब्येतीमुळे याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून या व्यक्तीचा राजीनामा घेण्यासाठी ८४ दिवस का लागले? असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला कोंडीत पकडले.

देर आए, दुरुस्त आए - पंकजा मुंडे

“धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे मी स्वागत करते. हा राजीनामा फार आधी यायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती. संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवाराच्या वेदनांपुढे राजीनाम्याचा निर्णय मोठा नाही. ‘देर आए, दुरुस्त आए’. देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ उघडायची माझी हिंमत झाली नाही, असे भावना भाजप नेत्या आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

ही गुन्ह्याची कबुली - संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले. यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे!”

हे सरकार बरखास्त केले पाहिजे - आदित्य ठाकरे

जे फोटो काल व्हायरल झाले ते मुख्यमंत्र्यांकडे आले नाहीत का? धनंजय मुंडे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, तिथे बैठक झाली. मुख्यमंत्री बोलावून घेऊ शकत नाही का? सरपंच संतोष देशमुख यांना आपण न्याय देऊ शकत नसाल, तर हे सरकार बरखास्त केले पाहिजे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंडेंना कार्यमुक्त केले - फडणवीस

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिला असून, त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधलेत? - उद्धव ठाकरे

देशमुख यांच्या हत्येचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर, त्यांचे स्वागत आहे. परंतु, पारदर्शी कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधले आहेत का? आधी फक्त यूपी आणि बिहारचे नाव बदनाम होते. आता महाराष्ट्रातील परिस्थिती यापेक्षाही अतिशय वाईट झाली आहे. या तिन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे, असा घणाघात शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवला.

फडणवीसांवर हक्कभंग आणणार - नाना पटोले

धनंजय मुंडेंचा राजीनामा लपवता यावा, यासाठी मंगळवारचे कामकाज बंद पाडण्यात आले, या सरकारचा निषेध केला पाहिजे. मुख्यमंत्री रात्री ताफा घेऊन अजित पवारांना भेटायला जातात, राजीनामा लिहून घेतात. राजीनामा आल्यानंतर त्यांनी थेट माध्यमांना येऊन सांगितले. पण, नियमानुसार मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगणे अपेक्षित होते. त्यामुळे आम्ही बुधवारी मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणणार आहोत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी सांगितले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री