महाराष्ट्र

Diwali 2025: दिवाळीच्या सुट्टीत मुंबईकर निघाले फिरायला! पुण्यात वाहतूक कोंडी; एक्सप्रेसवे, महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

दिवाळीची लांब सुट्टी आणि विकेंड यामुळे मुंबईकरांनी गावी आणि पर्यटनस्थळांकडे कूच केलं आहे. त्यामुळे शनिवारीप्रमाणेच आजही (दि. १९) पुणे आणि परिसरातील प्रमुख महामार्गांवर तीव्र वाहतूक कोंडी कायम आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग तसेच पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

नेहा जाधव - तांबे

दिवाळीची लांब सुट्टी आणि विकेंड यामुळे मुंबईकरांनी गावी आणि पर्यटनस्थळांकडे कूच केलं आहे. त्यामुळे शनिवारीप्रमाणेच आजही (दि. १९) पुणे आणि परिसरातील प्रमुख महामार्गांवर तीव्र वाहतूक कोंडी कायम आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग तसेच पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

लोणावळा, देहू रोड सेंट्रल चौक, तळेगाव दाभाडे, नर्हे, खेड शिवपूर, सातारा आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गांवर ३ ते ४ किमी लांबीच्या वाहनांच्या रांगा दिसत आहेत. पुणे-नाशिक या २१४ किमी अंतराच्या मार्गासाठी सरासरी वेळेपेक्षा दोन ते तीन तास अधिक वेळ लागत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. चाकण परिसरातही औद्योगिक वाहतुकीमुळे प्रचंड गर्दी झाली आहे.

दरम्यान, नगर व छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारी वाहने वळवण्यात येत असल्याने वाहतुकीत आणखी अडथळे निर्माण झाले आहेत. लांब वीकेंड आणि हॉलिडे असल्यामुळे अनेकांनी शनिवारीच प्रवासास सुरुवात केली. त्यामुळे नेहमीपेक्षा शनिवार-रविवारी जास्त गर्दी पाहायला मिळत आहे.

महामार्गांवरील दुरुस्तीची कामे, बंद लेन, पर्यायी मार्ग, तसेच टोल प्लाझावर फास्टॅग स्कॅनिंगचा विलंब या सगळ्या कारणांमुळे वाहतूक संथ झाली आहे. त्यात मालवाहतूक आणि औद्योगिक वाहतूक वाढल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे.

सांगलीतील कासेगाव येथील रहिवासी केतन पटणी म्हणाले, “मुख्य मार्गावरून प्रवास करायचा असल्यास सकाळी सहा वाजण्यापूर्वी निघा किंवा पर्यायी मार्ग निवडा. काही ठिकाणी तीन-चार तासांचा प्रवास दहा तासांपर्यंत वाढतोय. निघण्यापूर्वी गुगल मॅप्स किंवा इतर अ‍ॅप्सवर रिअल-टाइम ट्रॅफिक तपासा.” त्यांनी दिवाळीनंतर परतीच्या प्रवासातही अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली.

दिवाळीमुळे प्रवासाचा ओघ वाढला

दिवाळी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. मुंबई आणि पुणे या शहरी केंद्रांमध्ये नोकरी व शिक्षणासाठी आलेले लाखो लोक या काळात आपल्या गावी परततात. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रवास होत आहे.

तसेच महाबळेश्वर, कोकण, गोवा, लोणावळा, नाशिक या पर्यटनस्थळांकडेही हजारो प्रवासी रवाना झाले आहेत. पुण्यातील शाळा, औद्योगिक पट्टे आणि आयटी कंपन्यांनी दिलेल्या आठवडाभराच्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखी वाढली आहे.

सध्या लक्ष्मी रोड, टिळक रोड, जेएम रोड, डेक्कन, पेठ क्षेत्र अशा शहरातील गर्दीच्या भागांत दिवाळी खरेदीमुळे वाहतूक कोंडी कायम आहे. मात्र, मुख्य सण सुरू झाल्यानंतर स्थिती सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बहुतेक कुटुंबे गावी गेल्यामुळे सोमवार ते बुधवारदरम्यान शहरातील वाहतूक तुलनेने सुरळीत राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बाजारपेठा आणि अंतर्गत रस्त्यांवर दिवाळीच्या मुख्य दिवसांत कमी गर्दी अपेक्षित असली तरी संध्याकाळच्या वेळी मंदिरे आणि सोसायटी परिसरात थोडीशी वर्दळ होऊ शकते.

अयोध्येत २९ लाख दिव्यांची विक्रमी आरास! ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून पाजला ज्यूस; "किती ही सत्तेची मस्ती"...रोहित पवारांचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल

Mumbai : घर बदलणं महागात पडलं! 'मूव्हर्स अँड पॅकर्स'च्या कर्मचाऱ्यांनी ६.८ लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास; गुन्हा दाखल

Mumbai : १५ वर्षांनंतर MMRDA चा निर्णय; वडाळा ट्रक टर्मिनल प्लॉटचा १,६२९ कोटींना लिलाव होणार

'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन