मुंबई : दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने खासगी बसचालकांनी भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ केली आहे. काही मार्गांवर खासगी बसचे भाडे तब्बल सात हजार रुपयांपर्यंत वाढविल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. खासगी बसचे भाडे थेट विमानाच्या तिकीटदराशी बरोबरी करीत असल्याटी टीका प्रवाशांनी केली आहे.
खासगी बसच्या वाढत्या भाड्याच्या अनुषंगाने अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमांवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागावर टीका केली आहे. खासगी बसच्या भाड्यावर नियंत्रण ठेवण्यात परिवहन विभाग अपयशी ठरल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. एका मार्गावरील बसचे भाडे ७०० रुपयांवरून चार हजार रुपयांपर्यंत वाढल्याचा दावा एका प्रवाशाने समाजमाध्यमांवर केला आहे. खासगी बसच्या भाड्यावर कोणतेही सरकारी नियंत्रण नाही का? तिकिटांचे दर सहा ते सात हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हे दर विमानाच्या तिकिटांइतकेच आहेत. ऐनवेळी तिकीट काढणाऱ्या प्रवाशांनी काय करायचे, असा संतप्त सवाल एका प्रवाशाने केला.
खासगी कंत्राटी बसची विशेष तपासणी मोहीम
दुसऱ्या एका प्रवाशाने परिवहनमंत्री झोपले आहेत की झोपेचे सोंग घेत आहेत, असा सवाल उपस्थित केला. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वर्षभर मेहनत करणारे नागरिक दिवाळीत कुटुंबीयांसोबत आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी गावी जाण्याची प्रतीक्षा करतात. अशा वेळी बसचे भाडे ७०० रुपयांवरून चार हजार रुपये कसे होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित प्रवाशाने तिकीट बुकिंग ॲपचे स्क्रीनशॉटही शेअर केले.
प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एक नोव्हेंबरपासून खासगी कंत्राटी बसची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. अवाजवी भाडेवाढ रोखण्यासाठी ही मोहीम २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
तक्रार इथे करा...
अवाजवी भाडे आकारल्यास प्रवाशांना आरटीओच्या १८००-२२-०११० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. तक्रार करताना संबंधित बसची माहिती आणि तिकिटाचे छायाचित्र पाठवावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.