कराड : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे गुरुवारी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. यावेळी शासकीय पातळीवरही उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब न्हाऊन निघाला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, साताऱ्याचे भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील, फलटणचे आमदार सचिन कांबळे, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पुष्प अर्पण करून स्वागत केले. यावेळी पोलीस बँड पथकामार्फत विविध धून वाजून स्वागत करण्यात आले.
नीरा नदीतील स्नानानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. सातारा जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सन २०२५ निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन, मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळत आहे. प्रशासनाने वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच जागोजागी स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.