महाराष्ट्र

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका; सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

Maharashtra assembly elections 2024 : निवडणुकीच्या प्रचाराच्या साहित्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांचे छायाचित्र आणि व्हिडीओ वापरले जाऊ नयेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणुकीच्या प्रचाराच्या साहित्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांचे छायाचित्र आणि व्हिडीओ वापरले जाऊ नयेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले आहेत. तुम्ही स्वत:च्या पायावर उभे राहा, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार आणि त्यांच्या पक्षातील कुठल्याही सदस्याने शरद पवारांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नयेत, असे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घड्याळ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. या चिन्हाचा वाद न्यायालयात प्रलंबित असून त्यावर बुधवारी सुनावणी झाली. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने अजित पवार गटाला ३६ तासांच्या कालावधीत वृत्तपत्रांमध्ये विशेषत: मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करण्यास सांगितले होते. त्याबाबतची माहिती अजित पवार यांच्या वकिलांनी न्या. सूर्य कान्त आणि न्या. उज्ज्वला भुईया यांच्या खंडपीठासमोर दिली.

आजच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने अजित पवार गटाला निवडणुकीच्या साहित्यात शरद पवारांची छायाचित्रे आणि व्हिडिओ वापरू नका, असे तोंडी आदेश दिले.

अमोल मिटकरींकडून शरद पवारांच्या छायाचित्राचा वापर

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर करण्यात आला. अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी हे शरद पवारांचे छायाचित्र लावत असल्याचे यावेळी निदर्शनास आणले. त्यावर अजित पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी आरोप फेटाळून लावले व हे साहित्य बनावट आहे, असे सांगितले. त्यावर सिंघवी यांनी प्रत्युत्तर दिले की, हा व्हिडिओ अमोल मिटकरी यांच्या अधिकृत हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांना फुटीबद्दल माहिती नाही असे वाटते का? समाज माध्यामावर केलेल्या पोस्टचा ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांवर प्रभाव पडेल का, असा सवाल न्या. सूर्य कांत यांनी सिंघवी यांना विचारला. मात्र, अजित पवार गटाकडून अद्यापही शरद पवारांसोबत काही संबंध आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे, ३६ जागांवर अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारात थेट लढत असल्याचे सिंघवींनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले.

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार 'करेक्ट कार्यक्रम' याकडे सर्वांच्या नजरा!

ठाण्यात महायुतीतील उमेदवारांचे टेन्शन वाढले?घटक पक्षांतील कार्यकर्त्यांनी प्रचाराला मारली दांडी

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

मतदान टक्का वाढीसाठी भव्य ऑफर; मतदारांना खरेदी, खानपान आणि मनोरंजनातही मिळणार सवलत

निवडणूक प्रचार साहित्याची खरेदी गुजरातमधून; महाराष्ट्रातील विक्रेत्यांना मात्र आर्थिक झळ