कर्जत : सोलापूर-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये अचानक एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या. तेव्हा सायन येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रशांत बोडगे हे तातडीने या महिलेच्या मदतीला धावून गेले. त्यांनी एक्स्प्रेसमध्येच या महिलेची प्रसूती केली.
सोलापूरच्या सोरेगाव येथील गर्भवती महिला दीक्षा बनसोडे ठाणे येथे येण्यासाठी सोलापूर स्थानकाहून निघाल्या होत्या. कर्जत स्थानक सोडल्यानंतर शुक्रवारी पहाटे अचानक त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. सुदैवाने त्याच डब्ब्यातून स्त्रीरोगत्ज्ञ डॉ. प्रशांत बोडगे प्रवास करीत होते. त्यांनी गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न करता रेल्वे हेल्पलाइनशी संपर्क साधला.
दरम्यान, ट्रेन कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानक दरम्यान असताना क्षणभरही न डगमगता इथेच प्रसूती करावी लागेल, असा धाडसी निर्णय डॉक्टरांनी घेतला. रेल्वेच्या डब्यात, मर्यादित साधनांसह त्यांनी ही प्रसूती केली. या महिलेने गोंडस कन्येला जन्म दिला. प्रसूतीनंतर आई व बाळ दोघांनाही नेरळ स्थानकात उतरवून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. तेथे उपचारानंतर आई आणि बाळाला कुटुंबासोबत ठाणे येथे पाठविण्यात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अत्यंत संयमाने धाडसी निर्णय घेऊन मर्यादित साधनांसह यशस्वी प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे.