नाशिक : शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर उपाय म्हणून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, द्वारका सर्कल ते नाशिक रोड (दत्त मंदिर) या ६.४ किलोमीटर अंतराच्या महामार्गाच्या रुंदीकरण प्रकल्पाला अंतिम मान्यता मिळाली आहे. राज्य वित्त आयोग तसेच केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्रालयाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे.
सुमारे २२० कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे नाशिक शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पांतर्गत मुख्य रस्ता सहा पदरी करण्यात येणार असून, दोन्ही बाजूंना सर्विस रोड देखील उभारण्यात येणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कामास चालू महिन्याच्या अखेरीस प्रारंभ होणार असून मार्च २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण
गेल्या मार्च महिन्यात या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे ती थांबली होती. आता राज्य वित्त आयोग आणि केंद्रीय मंत्रालयाच्या मान्यतेनंतर ही प्रक्रिया पुन्हा गतिमान होणार आहे.या प्रकल्पासाठी महापालिका पातळीवरही पाठपुरावा करण्यात आला होता. महापौर हिमगौरी आडके यांनी उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र दोंदे यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली होती. नंतर नवी दिल्ली येथे ८ मे रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली.
दररोज हजारो वाहनांची वर्दळ
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० अंतर्गत येणारा द्वारका सर्कल ते नाशिक रोड हा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक, विभागीय आयुक्तालय तसेच सिन्नरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मुळे वारंवार वाहतूककोंडी निर्माण होत असल्याचे चित्र आहे. प्रस्तावित सहा पदरी रस्ता झाल्यानंतर ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.